Aishwarya Narkar Shares Working Experience With Ashok Saraf : नाटक, चित्रपट, मालिका अशा मनोरंजनाच्या प्रांगणात मुक्तपणे मुशाफिरी करणारे ज्येष्ठ अभिनेते म्हणजे महाराष्ट्र भूषण आणि पद्मश्री पुरस्कार प्राप्त अशोक सराफ. गेली अनेक दशकं अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयाने मराठीच नव्हे तर; हिंदी प्रेक्षकांच्या मनावरही अधिराज्य गाजवलं आहे. विनोदी, गंभीर तसंच नकारात्मक भूमिकांमधून त्यांनी सर्वांचंच भरभरून मनोरंजन केलं आहे.

अशोक सराफांनी त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीत अनेक कलाकारांबरोबर काम केलं आहे. या कलाकारांनी अशोक सराफ यांच्याबरोबरच्या कामाचे वेगवेगळे अनुभव शेअरही केले आहेत. अशातच ऐश्वर्या नारकरांनीसुद्धा त्यांचा अशोक सराफ यांच्याबरोबरच्या पहिल्या कामाचा अनुभव शेअर केला आहे.

नुकत्याच एका मुलाखतीत ऐश्वर्या नारकरांनी त्यांचा सन लाडकी सासरची या चित्रपटामधील अशोक सराफ यांच्याबरोबर केलेल्या सुनेच्या भूमिकेचा अनुभव शेअर केला. यावेळी त्यांनी अशोक सराफांनी सेटवर कसं सांभाळून घेतलं? हेही सांगितलं.

पहिल्या सिनेमाच्या वेळी मामांनी खुप मदत केली होती : ऐश्वर्या नारकर

लोकशाही फ्रेंडलीला दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, “‘सून लाडकी सासरची’ हा माझा पहिला सिनेमा होता आणि त्यात अशोक मामांनी माझ्या सासऱ्यांची भूमिका केली होती. या सिनेमाच्यावेळी मामांनी खूप मदत केली होती. तेव्हा मी अगदीच नवखी होते. कॅमेऱ्यासमोर कसं उभं राहायचं… कसं बोलायचं.. याबद्दल मला काहीच माहिती नव्हतं.”

यानंतर त्या म्हणतात, “मनोरंजन या क्षेत्रात येऊन मला अगदी एक वर्षच झालं होतं. मी त्याआधी नाटकच करत होते. त्यामुळे मला तितकासा अनुभव नव्हता. तेव्हा कोणताही सीन कधीही केला जायचा, त्यामुळे अभिनयातलं ते सातत्य आपल्याला कायम ठेवता येईल का? असा विचार माझ्या मनात यायचा. तेव्हा सेटवर मामांशिवाय काही इतर लोकांनीही मला मदत केली होती.”

दरम्यान, ऐश्वर्या नारकर यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्या झी मराठीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत होत्या. यानंतर अद्याप त्या प्रेक्षकांच्या समोर कोणत्या प्रोजेक्टमधून आल्या नाहीत. पण त्या सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. सोशल मीडियावर त्या अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करत असतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर अशोक सराफ याच्याबद्दल सांगायचं झाल्यास, ते सध्या कलर्स मराठीवरील मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ‘अशोक मा. मा.’ या लोकप्रिय मालिकेतून ते प्रेक्षकांचं मनरंजन करत असून या मालिकेतील त्यांची आजोबांची भूमिका अनेकांच्या चांगलीच पसंतीस पडत आहे.