Amruta Khanvilkar on Troller’s : अमृता खानविलकर मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. आजवर तिने अनेक चित्रपटांमधून विविध भूमिका साकारल्या आहेत. अमृता मराठीसह हिंदीतही चित्रपट, वेब सीरिजमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसते; त्यामुळे तिचा चाहतावर्ग मोठा आहे. अमृता सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते. तिच्या ब्लॉगमार्फत ती तिच्या दैनंदिन अपडेट शेअर करत असते. अशातच अमृताने तिला सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांबद्दल सांगितलं आहे.

अमृताने काही दिवसांपूर्वी तिचं स्वत:चं नवीन घर खरेदी केलं. अभिनेत्रीने नवीन घराचा ब्लॉगही तिच्या यूट्यूब चॅनेलवरून शेअर केला होता. परंतु, या दरम्यान तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केल्याचं तिने सांगितलं आहे. अमृताने ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये याबाबत सांगितलं आहे. अमृता म्हणाली, “मी माझ्या नवीन घराचा व्हिडीओ टाकला होता, त्यात मला ट्रोल केलं गेलं, कारण मी पूजेला एकटी बसले होते. ती वास्तुशांत नव्हती; कारण वास्तुशांत मी मार्चनंतर करणार होते, त्यामुळे घरातल्या घरात एक छोटी पूजा केली होती.”

अमृता पुढे म्हणाली, “तेव्हा हिमांशू त्याच्या शूटिंगच्या निमित्ताने सकाळीच बाहेर गेला होता आणि तो रात्री खूप उशिराने येणार होता, म्हणून माझे गुरूजी म्हणाले ठीक आहे, तुम्ही बसा, काही हरकत नाही. तसंही घरातली कुठलीही छोटी पूजा असेल तर ती मी करतेच, कारण सतत हिमांशूची वेळ घ्या, तेव्हा मला वेळ आहे का बघा; मग आमच्या दोघांच्या वेळेनुसार गुरुजींची वेळ विचारणं या सगळ्यात बराच वेळ जातो आणि हिमांशू नंतर आला होता. पण मला असं वाटतं की, मी घर घेऊ शकते, मी पैसे कमावू शकते, पण मी पूजेला नाही बसू शकत असं का?”

अमृता पुढे म्हणाली, “मला त्यांच्या यामागच्या भावना समजतात की, जोडीने पूजेला बसलं पाहिजे. पण प्लीज, हे इतकं तुम्ही बोलणार, इतक्या टोकाला जाऊन तुम्ही बोलणार? आणि बायकाच बोलतात. मला कळत नाही त्या का असं करतात. एकटीने पूजेला बसल्याने काही होत नाही आणि खरंतर मला ट्रोलिंगचा काही फरक पडत नाही; माझं काहीही नुकसान होत नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ट्रोलिंगबद्दल अमृता पुढे म्हणाली, “मी खूप चांगल्या भावनेने तो व्हिडीओ पोस्ट केला होता. आज एक स्त्री तिच्या स्वकमाईने तिचं घर खरेदी करतीये ही खूप मोठी गोष्ट आहे. तिने स्वत:च्या पायावर उभं राहणं, आर्थिकदृष्ट्या कोणावरही अवलंबून न राहणं, स्वत:साठी एक घर घेणं किती गरजेचं आहे आणि जर ते तुम्ही करू शकता तर तो आनंद तुम्ही साजरा करू शकता. ते करण्यासाठी तुम्हाला कोणाची गरज नाही. मी असंही सांगत नाहीये की सगळं एकटीनेच करा, पण तुमच्या कुटुंबीयांची काळजी घेत असताना तुम्ही स्वत:साठी काहीतरी करू शकता, यात काहीच वावगं नाहीये.”