रंगभूमीचा रुपेरी पडदा, चित्रपटाची सोनेरी स्क्रीन किंवा टीव्हीच्या लहान स्क्रीनद्वारे आपल्या अभिनयाची मुशाफिरी करणारे बहुरूपी अभिनेते म्हणजे अशोक सराफ. गेल्या पाच दशकांकडून अधिक काळ त्यांनी मराठीबरोबरच हिंदी प्रेक्षकांचेही मनोरंजन केले. आजवरच्या कारकिर्दीत त्यांनी ३०० हून अधिक सिनेमांमध्ये काम करत प्रेक्षकांच्या मनात एक अढळ निर्माण केले. त्यांचे चाहते त्यांना प्रेमाने ‘अशोक मामा’ असं म्हणतात. याच अशोक मामांचा आज ७८ वा वाढदिवस आहे.

मराठी रंगभूमी आणि मराठी सिनेजगतामध्ये भरीव योगदान देणाऱ्या कलाकारांच्या यादीत अशोक सराफ यांचं नाव अगदी आदरानं घेतलं जातं. याच योगदानाबद्दल काही दिवसांपूर्वी भारत सरकारनं ‘पद्मश्री’ या मानाच्या पुरस्काराने सन्मानित केलं. पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्यावर शुभेच्छा आणि कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. अशातच आज त्यांच्यावर ७८ व्या वाढदिवसानिमितही कलाकार व चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

अशोक सराफ सध्या कलर्स मराठीवरील ‘अशोक मा.मा.’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. या मालिकेतील कलाकार अशोक सराफ यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत आहेत. अभिनेता इंद्रनील कामतने अशोक सराफ यांना वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्याने अशोक सराफ यांच्याबरोबरचा फोटो शेअर करत त्यांना ‘हिमालयाची सावली’ म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

या पोस्टमध्ये इंद्रनील असं म्हणतो, “तुम्हाला म्हणालो तसं, मी माझ्या कॉलेजवयीन इंद्रनीलला सांगितलं की, मी आता अशोक सराफ यांच्याबरोबर काम केलं तर तो माझ्यावर हसेल. त्याचा माझ्यावर विश्वास नाही बसणार. अशोक सराफांबरोबर काम करत असताना कामावर निष्ठा कशी ठेवावी हे समजून घेता आलं. माणूस आणि कलाकार म्हणून त्यांना अनुभवता आलं. त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली हा स्वामींचाच आशीर्वाद समजतो.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापुढे इंद्रनील असं म्हणाला, “मराठीमध्ये सुद्धा सुपरस्टार निर्माण होऊ शकतो असा विश्वास तुम्ही आम्हा तरुण कलाकारांना दिला आहे. तुमच्या इतकं वलय निर्माण करणं अशक्यच आहे; पण तुमच्या पाऊलावर पाऊल ठेवण्याचा कलाकार म्हणून नेहमीच प्रयत्न राहील. तुमच्या वाढदिवसानिमत्त मी आशीर्वादच मागेन. तुम्हाला मी काय शुभेच्छा देणार. तुम्ही आमचे सुपरस्टार आहात, यंग मॅन! हॅपी बर्थडे.”