Ashok Saraf & Nivedita Saraf : मनोरंजनसृष्टीतील आदर्श व एव्हरग्रीन जोडी म्हणून अशोक व निवेदिता सराफ यांना ओळखलं जातं. ‘मामला पोरींचा’ या चित्रपटाच्या सेटवर जुळलेले यांच्या मनाचे बंध पुढे जाऊन लग्नाच्या रेशीमगाठीत अडकले. अशोक व निवेदिता यांचा लग्नसोहळा गोव्यात पार पडला होता. या दोघांच्या सहजीवनाच्या प्रवासाला २७ जूनला ३६ वर्षे पूर्ण झाली. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अशोक सराफ यांनी निवेदिता यांचं भरभरून कौतुक केलं.
निवेदिताशी लग्न करणं हा आयुष्यातील सगळ्यात चांगला निर्णय होता असं अशोक सराफ यांनी ‘अमुक तमुक’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. अशोक सराफ म्हणाले, “मी तिच्याबद्दल एका वाक्यात उत्तर देईन ती आहे म्हणून मी आहे.”
“ती माझ्या आयुष्यात नसती तर मी भरकटलो असतो. मला घराकडे पाहावं लागतच नाही. मी फक्त काम करत राहतो. बाकी संपूर्ण घराचा भार तिने घेतलाय. ती घरचं सगळं काम जबाबदारीने हाताळते. माझ्या व्यवहारापासून, मला येणारे फोन, माझ्या सगळ्या गोष्टींकडे तिचं व्यवस्थित लक्ष असतं. सगळं काम ती करते. मला खरंच काहीच करावं लागत नाही.” असं अशोक सराफ यांनी सांगितलं.
अभिनेत्री असूनही निवेदिताचं घर-संसाराकडे खूप लक्ष…
“निवेदिता स्वत: अभिनेत्री आहे तरीही तिचं घर-संसाराकडे खूप लक्ष असतं. तिची सिनेविश्वात अनेक कामं, भूमिका सुरू आहेत…तरीही सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं हे खरंच खूप कौतुकास्पद आहे. मध्यंतरी मला मानेचा त्रास होत होता…रोज रात्री घरी आल्यावर ती मला मलम लावायची; त्याशिवाय झोपायची नाही. ती माझ्यापेक्षा उशिरा घरी येते तरीही सगळ्या गोष्टी आठवणीने करते. मी शूटवरुन ८-८.३० ला घरी येतो आणि तिला घरी यायला रात्रीचे ११ वाजतात.”
मला अजून काय पाहिजे…
“एकदा माणसाचा स्वभाव समजला की, नातं अजून घट्ट होतं. आज निवेदितावर मी सगळ्या गोष्टी निश्चिंत होऊन सोडतो. मी माझ्या आयुष्यात बऱ्याच चांगल्या गोष्टी केल्या असतील. पण, मी सगळ्यात चांगलं काही केलं असेन तर तिच्याशी लग्न. भांडणं सगळ्यांची होतात…पण, आमच्यात मी कितीही भडकलो तरी पहिली ती येते… अजून मला काय पाहिजे.” असं अशोक सराफ यांनी सांगितलं.