Ashok Saraf And Sachin Pilgaonkar Friendship : आजही मैत्रीचं उदाहरण देताना अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर आणि अशोक सराफ या त्रिकुटाचं नाव घेतलं जातं. या त्रिकुटाची मैत्री आपण रुपेरी पडद्यावर पाहिलीच; पण खऱ्या आयुष्यातही या तिघांची मैत्री अगदी घट्ट होती. त्यांच्या मैत्रीचा प्रेक्षकांना कायमच हेवा वाटायचा… आजही वाटतो.
९० च्या दशकात अशोक सराफ, सचिन पिळगांवकर आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी एकापेक्षा एक सिनेमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. तेव्हापासूनची त्यांची मैत्री अजूनही कायम आहे. या त्रिकुटामधील लक्ष्मीकांत बेर्डे आज आपल्यात नाहीत. पण सचिन पिळगांवकर आणि अशोक सराफ हे आजही एकमेकांचे घनिष्ट मित्र आहेत.
‘मायबाप’ या सिनेमानिमित्त सचिन पिळगांवकर आणि अशोक सराफ हे दोघे एकत्र आले आणि तेव्हापासून त्यांच्यातली मैत्री अजूनही तशीच आहे. दोघांच्या या मैत्रीबद्दल अशोक सराफांनी एक जुना किस्सा सांगितला आहे. Radio Nasha Official या युट्यूब वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अशोक सराफ यांनी काही जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
सचिन माझ्याशिवाय सिनेमे करतच नाही : अशोक सराफ
याबद्दल अशोक सराफांनी असं म्हटलं, “‘मायबाप’ हा सचिनने दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट होता. त्यानंतर आमची चांगली मैत्री झाली. यात आम्ही दोघांनी एकत्र काम केलं. त्याने एकूण १५ मराठी सिनेमे केले आणि त्याच्या प्रत्येक सिनेमात मी आहे. माझ्याशिवाय तो सिनेमे करतच नाही. खरंतर, त्याच्याबरोबर आधी मैत्री नव्हती; त्याच्या वडिलांशी होती. त्याचे वडील शरद पिळगांवकर हे निर्माते होते. त्यांनी जे सिनेमे केले, त्यात मी काम करत असे.”
यानंतर ते सांगतात, “सचिनआधी मी त्याच्या वडिलांचा मित्र होतो. मी त्यांच्या ऑफिसमध्ये बसलेलो असायचो तेव्हा सचिनबरोबर थोडंफार बोलणं व्हायचं. पण त्यानंतर सचिन आणि मी एकत्र काम करायला लागलो; तेव्हा आमचं चांगलं बॉंण्डिंग जमलं. मग आम्ही इतके चांगले मित्र झालो की, त्याला माझ्याकडून कशा पद्धतीचं काम हवं आहे ते मला कळायचं आणि मी आणखी किती वेगळ्या पद्धतीने काम करु शकतो हे त्याला कळायचं. त्यानंतर आम्ही अनेक हिट सिनेमे केले.”
दरम्यान, सचिन पिळगांवकर आणि अशोक सराफ यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी ‘अशी ही बनवाबनवी’, ‘नवरा माझा नवसाचा’, ‘माझा नवरा करोडपती’, ‘आयत्या घरात घरोबा’, ‘गंमत जंमत’ अशा अनेक मराठी चित्रपटात एकत्र काम केलं आहे. हे सगळे सिनेमे आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.