केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ चित्रपट ३० जूनला प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होऊन तीन आठवडे पूर्ण झाले आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ६० कोटींहून अधिकचा गल्ला जमवला आहे. तसेच या चित्रपटाने अनेक रेकॉर्डही ब्रेक केले आहेत. ‘बाईपण भारी देवा’ च्या संपूर्ण टीमने नुकतंच चित्रपटाच्या यशाचे जंगी सेलिब्रेशनही केले. मराठी चित्रपटाचा बॉक्स ऑफीसवर पुन्हा डंका वाजला ही गोष्ट तशी फारच समाधानकारक ठरली आहे.
दिग्दर्शक केदार शिंदे यांनी नाटक, मालिका अन् चित्रपट अशा तीनही माध्यमातून उत्तम कलाकृती लोकांसमोर आणल्या. प्रेक्षकांनीही त्यांच्या चांगल्या चित्रपटांना उत्तम प्रतिसाद दिला. नुकतंच ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये केदार शिंदे यांनी त्यांच्या मनोरंजन क्षेत्रातील प्रवासाबद्दल खुलासा केला आहे. इतकंच नव्हे तर आपल्या या जीवनपटाचं संपूर्ण श्रेय त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिलं आहे.
आणखी वाचा : वादाच्या भोवऱ्यात अडकूनही ‘ओपनहायमर’ची यशस्वी घोडदौड सुरू; तिसऱ्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी
याबद्दल बोलताना केदार शिंदे म्हणाले, “माझ्या या सगळ्या यशाचं अधिक श्रेय राज ठाकरे यांना जातं. ते माझे ‘फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड आहेत. यात कोणताही राजकीय संदर्भ नाही, माझं आणि त्यांचं एक कलाकार म्हणून नातं आहे. वयाच्या २८ व्या वर्षी मी ‘अगंबाई अरेच्या’ हा चित्रपट केला. तेव्हापासून राज ठाकरे हे कायम माझ्या पाठीशी उभे आहेत. त्यानंतर ‘जत्रा’ करताना मी माझं सर्वकाही पणाला लावलं.”
पुढे ते म्हणाले, “जत्रानंतर मी काही बरे-वाईट चित्रपट केले. त्यानंतर मी ‘अगंबाई अरेच्या २’ केला, मनोरंजनसृष्टीतील बरेच लोक त्याच्या प्रीमियरला आले, त्यावेळी कुणीच मला सांगितलं नाही की चित्रपट वाईट आहे, सगळ्यांनी तोंडावर कौतुक केलं. प्रदर्शनाच्या दिवशी मात्र सगळीकडे नकारात्मक चर्चा ऐकायला मिळत होती, त्यामुळेच मी जास्त दुखावलो.”
दरम्यान केदार शिंदे यांचा ‘बाईपण भारी देवा’ हा मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान हिट ठरला आहे. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी या अभिनेत्री प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहेत.