Better Half Chi Love Story OTT Release : ओटीटी हे आता मनोरंजनासाठीचं नवं माध्यम म्हणून उदयास आलं आहे. ओटीटीमुळे जगातल्या कोणत्याही पद्धतीचा सिनेमा, सीरिज किंवा एखादा शो अगदी घरबसल्या पाहता येतो. जगभरातील अनेक भाषांतील सीरिज आणि सिनेमे प्रेक्षकांना पाहायला मिळतात.
हिंदीसह मराठी सिनेमा आणि शोचा प्रेक्षकवर्गही आता ओटीटीकडे वळला आहे. ओटीटीमुळे सिनेमागृहांत पाहता न आलेले सिनेमे प्रेक्षकांना घरबसल्या पाहायला मिळतात. सिनेमागृहांत फारसे यश न मिळालेले सिनेमे ओटीटीर आल्यानंतर प्रेक्षकांकडून वाहवा मिळवताना दिसतात. अशातच आणखी एक मराठी सिनेमा ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अभिनेत्री रिंकू राजगुरू, प्रार्थना बेहेरे, अभिनेता सुबोध भावे, अनिकेत विश्वासराव असे मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय कलाकार असलेला रोमँटिक विनोदी चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ज्याचं नाव होतं ‘बेटर-हाफ ची लव्हस्टोरी’. २२ ऑगस्ट रोजी आलेल्या या सिनेमाने प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन केलं. अशातच आता हा सिनेमा ओटीटीवर येण्यास सज्ज झाला आहे.
संजय अमर दिग्दर्शित आणि रजत अग्रवाल निर्मित ‘बेटर-हाफ ची लव्हस्टोरी’ या सिनेमात रोमान्स, कॉमेडी, गूढ अन् हटके ट्विस्ट पाहायला मिळाले. या सिनेमाची गोष्ट सुबोध भावे यांच्या पात्राभोवती फिरते, ज्याच्या पत्नीचे निधन झाले आहे, पण तरीही त्याला तिचा भास होतो. त्यातून बाहेर पडण्यासाठी तो प्रयत्न करत आहे.
पत्नीच्या मृत्यूमुळे त्याला वाटते की, त्याला स्वातंत्र्य मिळाले. त्याच्या मृत बायकोचा आत्मा त्याच्या शरीरात प्रवेश करतो, ज्यामुळे कथानकात गोंधळ निर्माण होतात. तसंच विनोदनिर्मितीही होते. चित्रपटगृहांत पाहता न आलेल्या प्रेक्षकांना आता ‘बेटर-हाफ ची लव्हस्टोरी’ हा सिनेमा घरबसल्या पाहता येणार आहे.
अल्ट्रा झकासच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुबोध, रिंकू आणि प्रार्थनाचा ‘बेटर-हाफ ची लव्हस्टोरी’ हा सिनेमा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. १९ सप्टेंबर (गुरुवार) पासून हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.
‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ या चित्रपटाचे लेखन, छायांकन आणि दिग्दर्शन संजय अमर यांचेच असून, साजन पटेल आणि अमेय नरे यांनी संगीताची जबाबदारी सांभाळली आहे.