अभिनेते किरण माने ‘बिग बॉस मराठी’मुळे प्रसिद्धीझोतात आले. दोन महिन्यांपूर्वी हातात शिवबंधन बांधत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला होता. खूप विचार करून ही राजकीय भूमिका घेतल्याचं त्यांनी पक्षप्रवेश करताना सांगितलं होतं. अनेक सामाजिक व राजकीय मुद्द्यांवर किरण माने आपली परखड मतं समाजमाध्यमांवर मांडत असतात. निवडणुकीचं बिगुल वाजल्यावर त्यांनी शेअर केलेली अशीच एक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.

किरण माने यांनी पोस्ट शेअर करत सत्ताधारी पक्षासह उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीकास्त्र सोडलं आहे. शरद पवार पाठीशी असल्याने अजित पवारांचा एक रुबाब होता असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे. याशिवाय उदयनराजे भोसले यांच्या दिल्ली दौऱ्यावर देखील त्यांनी भाष्य केलं आहे.

sharad pawar replied to narendra modi
नरेंद्र मोदींच्या ‘अतृप्त आत्मा’ टीकेवर शरद पवारांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “त्यांचे म्हणणं खरं आहे, पण…”
devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
ncp jitendra awhad, sister shubhangi garje
जितेंद्र आव्हाड यांच्या भगिनी म्हणाल्या, “आनंद परांजपे यांनी औकातीत रहावे, घर सांभाळण्यासाठी आम्ही सक्षम…”

हेही वाचा : मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवणार अभिनेत्री स्वरा भास्कर? ‘या’ पक्षाकडून तिकीट मिळणार असल्याची चर्चा

किरण मानेंची पोस्ट

माझं आजोळ बारामती. मी गेली दहाबारा वर्ष अजितदादांना जवळून बघितलंय, सातार्‍याच्या सर्किट हाऊसमध्ये कलेक्टर-कमिशनरपास्नं पत्रकारांपर्यन्त सगळ्यांवर बिनधास्त डाफरताना बघितलंय. कुणाची पर्वा न करता रूबाबात फिरताना बघितलंय. गुरगुरताना बघितलंय. अशा रांगड्या माणसाला अमित शहापुढं लाचार, हतबल बनून उभं राहिलेलं पाहून सुरूवातीला लै वाईट वाटलं.

…हळूहळू कळलं की दादांचा तो रूबाब होता कारण पाठीशी साहेब होते. आता स्वबळावर झगडायचंय. अभिषेक बच्चनला वडिलांचा वरदहस्त काढून घेऊन एकदम यवतमाळला पाठवून एकांकिकांपास्नं स्ट्रगल करायला लावला तर कसं होईल? त्याला मनोज तिवारीसुद्धा हाडतुड करेल… तसं दादांचं झालंय हे कळलं. दादांविषयी आदर कमी नाही झाला पण त्यापेक्षा कीव जास्त वाटायला लागली.

जसं बारामती आजोळ, तशी माझी मायभूमी सातारा. पक्ष-फिक्ष बाजूला ठेवून आमचं सातारच्या गादीवर प्रेम. आज असं ऐकलं की, आम्हा सातारकरांचे आदरस्थान श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले तीन दिवस दिल्लीत आहेत…कारण त्यांना अमित शहाची अपॉईंटमेन्ट मिळत नाही! आजची भेटही रद्द झाली. उद्याची वेळ मिळालीय. हा फक्त महाराजांचा अपमान नाही, हा स्वराज्याच्या राजधानीचा अपमान आहे. एवढीच इच्छा आहे की महाराजांनी इतरांसारखे या हुकूमशहांचे ‘पपेट’ होऊ नये. वेळीच योग्य तो निर्णय घ्यावा.

मराठी माणसाचा अभिमान असणार्‍या नेत्यांना स्वाभिमान गहाण ठेवून परप्रांतीयांच्या वळचणीला जायची वेळ येणं हे मराठी मुलखासाठी घातक आहे. हे असेच चालू राहिले तर आपल्याला लवकरच ‘जय गुजरात’ अशी घोषणा देण्याची सक्ती आल्याशिवाय रहाणार नाही. ही अतिशयोक्ती नाही. आत्ताच मुंबईत हायकोर्टापासून अनेक ठिकाणी गुजराती बोर्ड दिमाखात झळकू लागलेले आहेत.
वेळीच जागे व्हा.

जय महाराष्ट्र!

किरण माने.

हेही वाचा : “ऐश्वर्या राय स्क्रीनवर साधी दिसावी यासाठी खूप प्रयत्न केले, पण…”, रणदीप हुड्डाचा खुलासा; म्हणाला, “सेटवर…”

किरण मानेंनी शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देत आपली मतं मांडली आहेत. याशिवाय त्यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर नुकतेच ते ‘तेरवं’ या चित्रपटात झळकले होते. या चित्रपटाचं कथानक विदर्भ मराठवाड्यात होणाऱ्या शेतकरी आत्महत्या या संवेदनशील विषयावर आधारित होतं.