VIdya Balan Praises Riteish Deshmukh : मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावणारा अभिनेता म्हणजे रितेश देशमुख. अभिनेता असण्याबरोबरच रितेश दिग्दर्शकसुद्धा आहे. वेड हा पहिला मराठी चित्रपट त्याने दिग्दर्शित केला आणि या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला. अशातच आता रितेश दिग्दर्शक म्हणून लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

काही दिवसांपूर्वी रितेशने या चित्रपटाची घोषणा करीत त्यामधील कलाकारांची नावे जाहीर केली होती. या चित्रपटात संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, जिनिलीया देशमुखसह अभिनेत्री विद्या बालनही असणार आहे. नुकत्याच एका मुलाखतीत विद्याने तिच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटामधील भूमिकेबद्दलचा आणि रितेशबरोबरच्या कामाचा अनुभव शेअर केला.

‘द हॉलीवूड रिपोर्टर इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत विद्या म्हणाली, “हो! मी नुकतंच त्या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केलं. तो चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित आहे; पण आता मी त्याबद्दल आणि भूमिकेबद्दल जास्त काही बोलू शकत नाही. हा अनुभव खूपच कमाल होता. मी रितेशबरोबर ‘हे बेबी’मध्ये म्हणून काम केलं आहे आणि त्यातील त्याचा विनोदी अभिनय खूपच कमाल होता. त्यानंतरही त्याने विविध प्रकारच्या भूमिका केल्या आहेत; पण दिग्दर्शक म्हणूनही तो उत्तम आहे.”

त्यानंतर ती म्हणते, “मी त्याच्याबरोबर काही सीन एकत्र केले आणि ते करताना खूपच भारी वाटलं. दिग्दर्शक म्हणून काम करताना त्याला तो एक अभिनेता असल्याचीही मदतच झाली. पण त्यानं ज्या पद्धतीनं दिग्दर्शक म्हणून माझ्याबरोबर काम केलं आणि आमच्यात जो काही संवाद झाला, तेसुद्धा मी खूपच एन्जॉय केलं. अशी कलाकृती करण्याचा त्याचा प्रयत्न वाखणण्याजोगा आहे. त्यामुळे अशा कलाकृतीचा एक भाग असल्याचा मला आनंद आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे विद्याने म्हटले, “या चित्रपटात संजय दत्तही आहेत. त्यांच्याबरोबरसुद्धा मी अनेक वर्षांनी काम करत आहे. आम्ही ‘मुन्नाभाई…’नंतर पुन्हा एकत्र काम करत आहोत. त्यांच्याबरोबरचा काम करण्याचा अनुभवही खूपच छान होता. आम्ही संपर्कात असतोच; पण इतक्या वर्षांनी पुन्हा एकदा एकत्र सेटवर भेटल्यानंतर मी त्यांना मिठी मारली आणि “लगे रहो मुन्नाभाई. तुझ्यारखा कोणीच नाही”, असं म्हटलं. तसेच मी विनोद चोप्रा यांना फोन करून सांगितलं की, संजय दत्त ‘मुन्नाभाई’चा तिसरा भाग करण्याचा विचार करीत आहेत.”