Chhaya Kadam Himachal Pradesh Government Award : ‘फँड्री’, ‘सैराट’, ‘न्युड’, ‘रेडू’, ‘सरला एक कोटी’ या आणि अशा काही गाजलेल्या मराठी तसंच ‘झुंड’ व ‘गंगूबाई काठियावाडी’, ‘मडगाव एक्स्प्रेस’ अशा काही बॉलीवूड चित्रपटांतून प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या अभिनेत्री म्हणजे छाया कदम. मराठी आणि हिंदीसह इतर भाषांतील प्रेक्षकांचंही त्यांनी मनोरंजन केलं आहे.
गेल्या काही वर्षांपासून छाया कदम यांनी आपल्या कमालीच्या अभिनयाने स्वतःचं वेगळंपण सिद्ध केल्याचे पाहिले. एकापेक्षा एक असे उत्तम प्रोजेक्ट्स करत त्यांनी सिनेसृष्टी गाजवली आहे. त्यांच्या या आजवरच्या कामाबद्दल त्यांचा अनेक पुरस्कारांनी गौरव करण्यात आला आहे.
अशातच त्यांचा हिमाचल प्रदेश राज्य सरकारच्या वतीने विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे.याबद्दल स्वतः छाया कदम यांनी पोस्ट शेअर केली आहे. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणाऱ्या छाया कदम या सोशल मीडियावरही तितक्याच सक्रिय असतात. सोशल मीडियाद्वारे त्या आपल्या कामाबद्दल माहिती देत असतात. तसंच स्वतःचे काही विविध लुक्समधील फोटोही शेअर करताना दिसतात.
अशातच त्यांची हिमाचल प्रदेश राज्य सरकारकडून मिळालेल्या विशेष पुरस्काराची पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टसह त्यांनी त्यांच्या आनंदी भावनाही व्यक्त केल्या आहेत. या पोस्टखालील कॅप्शनमध्ये त्यांनी, “हा केवळ माझा सन्मान नाही तर, माझ्या महाराष्ट्राचाही सन्मान आहे” असं म्हणत स्वतःच्या आनंदी भावना व्यक्त केल्या आहेत.
यापुढे त्या म्हणतात, “११ व्या शिमला इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची संधी तर मिळाली. सोबतच ‘लाल’ या माझ्या शॉर्ट फिल्मचे स्क्रिनिंग असल्यामुळे त्या आनंदात अजून भर पडली. पण या सगळ्याबरोबर एक विशेष गोष्ट अशी घडली की, मी आजपर्यंत केलेल्या कामाचा आढावा घेत हिमाचल प्रदेश राज्य सरकारच्या वतीने माझा विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.”
छाया कदम यांची इन्स्टाग्राम पोस्ट
यानंतर छाया कदम म्हणतात, “सन्मानाच्या निमित्ताने दाखविण्यात आलेली माझी लहानशी डॉक्युमेंट्री मला भावनिकरित्या सुखावणारी होती. आणि अर्थात हा सन्मान केवळ माझा नाही तर ज्या मातीने माझ्यातला कलाकार घडविला त्या माझ्या महाराष्ट्राचाही आहे. या फिल्म फेस्टिव्हलच्या निमित्ताने हिमाचल प्रदेश आणि शिमलामधील अनेक सांस्कृतिक गोष्टी अनुभवता आल्या. इथली माणसं – त्यांचे गोड स्वभाव अनुभवता आले. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे इथल्या लोकांचे सिनेमा कलाकृतीवर असलेले प्रेम अनुभवता आले. खूप आनंद आणि एक कलाकार म्हणून खूप समाधान.”
दरम्यान, या पोटखालील कमेंट्समध्ये छाया कदम यांच्या अनेक चाहत्यांनी त्यांना मिळालेल्या या विशेष पुरस्काराबद्दल कौतुक केलं आहे. तसंच त्यांना अभिनंदनही म्हटलंय. त्याचबरोबर कलाकार मंडळींकडूनही त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे.