Dashavatar Movie Actor : मराठी सिनेविश्वात सध्या ‘दशावतार’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुद्धा जबरदस्त कमाई करत असल्याचं पाहायला मिळत आहे. ‘दशावतार’ प्रदर्शित झाल्यापासून ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी साकारलेल्या बाबुली मेस्त्रीच्या भूमिकेचं सध्या सर्वत्र भरभरून कौतुक करण्यात येत आहे.
दिलीप प्रभावळकर यांच्यासह या सिनेमात अनेक कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. ‘दशावतार’ प्रदर्शित झाल्यापासून आणखी एका अभिनेत्याची सर्वत्र चर्चा होऊ लागलीये त्याचं नाव आहे सिद्धार्थ मेनन.
सिद्धार्थ मेनन हे नाव मराठी इंडस्ट्रीसाठी काही नवीन नाही. त्याने आजवर असंख्य गाजलेल्या सिनेमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. ‘एकुलती एक’, ‘पोश्टर गर्ल’, ‘पोपट’, ‘जून’ अशा अनेक मराठी सिनेमांमध्ये तो झळकला होता. याशिवाय सिद्धार्थने हिंदी सिनेमांमध्ये देखील आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. पण, तुम्हाला माहितीये का? सिद्धार्थ मूळचा केरळचा आहे. याबद्दल त्याने स्वत: पत्रकार परिषदेत खुलासा केला आहे.
“मल्ल्याळम सिनेमा गेल्या काही दिवसांत खूप चर्चेत आला आहे तरीही तू मराठी सिनेमात काम करण्याचं कारण काय? त्यात या सिनेमात खास मालवणी भाषेचा मेळ साधला गेलाय त्यामुळे हे सगळं तू कसं काय जमवलं?” असा प्रश्न अभिनेत्याला विचारण्यात आला.
यावर सिद्धार्थ मेनन म्हणतो, “मला असं वाटतं की, मी केरळमधील एकमेव अभिनेता असेन ज्याने अजूनपर्यंत मल्ल्याळम सिनेमात काम केलेलं नाहीये. पण, खरं सांगू मला याबद्दल काहीच खंत नाहीये. मला वाटतं, प्रत्येकवेळी मराठी दिग्दर्शकाने माझ्या करिअरला वाचवलेलं आहे, मला पाठिंबा दिलेला आहे. सुबोधला मी कॉलेजपासून ओळखत होतो. मी केरळचा जरी असलो तरी मी महाराष्ट्राचा मुलगा आहे. त्यातही मी पुण्याचा आहे. मी मराठीच आहे…लहानपणापासून मी इतके मराठी सिनेमे पाहिलेत अर्थात याचं क्रेडिट माझ्या आई-बाबांचं आहे. त्यांनी मला कायम पाठिंबा दिलाय.”
“माझा पहिला सिनेमा हिंदी होता. त्यानंतर मी मराठीत काम करायला सुरुवात केली. मराठी सिनेविश्वात खूप ताकद आहे, आपले सगळेच कलाकार खूप दिग्गज, मेहनती आणि सतत काहीतरी नवीन करू पाहणारे आहेत. अनेकदा मला लोक बोलतात, आता नको मराठी सिनेमा करायला…पण, मी त्यांना वेळोवेळी गप्प केलं आहे. मी हे अभिमानाने सांगेन की, मी कायम त्यांना सांगितलंय. हा आपला सिनेमा आहे, आपण यासाठी मेहनत केली पाहिजे. आपणच आपल्या सिनेमाला पुढे नेलं पाहिजे.” असं सिद्धार्थने यावेळी सांगितलं.