Devmanus Trailer released : ‘देवमाणूस’ या बहुप्रतिक्षित मराठी चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. तेजस प्रभा विजय देऊस्कर दिग्दर्शित या चित्रपटात महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

मुंबईत पार पडलेल्या भव्य ट्रेलर लॉन्च सोहळ्याला दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देऊस्कर, कलाकार महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे, सिद्धार्थ बोडके, अभिजीत खांडकेकर, लेखिका नेहा शितोळे तसेच निर्माते लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्यासह चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती.

ट्रेलरमध्ये ‘देवमाणूस’च्या रहस्यपूर्ण, गूढ आणि भावनिक कथानकाची झलक पाहायला मिळते. महेश मांजरेकर यांनी साकारलेल्या केशवराव नावाच्या पात्राची जमीन हडपण्याचे प्रयत्न ट्रेलरमध्ये पाहायला मिळतात. पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत सुबोध भावे आहे. तसेच सिद्धार्थ बोडखेने नकारात्मक पात्र दमदार वठवलंय. ट्रेलरमधील दमदार संवाद, जबरदस्त अभिनय, दाट भावनांचा प्रवाह आणि उत्कंठा वाढवणारे प्रसंग यामुळे हा चित्रपट एक संस्मरणीय सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे. ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे.

दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देऊस्कर म्हणाले, “देवमाणूस माझ्यासाठी अत्यंत जवळचा चित्रपट आहे. भावना, नाट्य आणि थरार यांचा सुरेख संगम या चित्रपटात आहे. लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी माझ्यावर विश्वास ठेवून पहिला मराठी चित्रपट दिग्दर्शित करण्याची संधी दिली, याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. संपूर्ण टीमच्या अथक मेहनतीमुळे हे स्वप्न प्रत्यक्षात साकारलं. प्रेक्षक या कथेशी आणि पात्रांशी कसा संवाद साधतात हे पाहाण्याची उत्सुकता लागली आहे.”

निर्माते लव रंजन म्हणाले, “देवमाणूस हा महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेला मनापासून दिलेला आदर आहे. त्यातील कला, संगीत आणि कथा सांगण्याची शैली यांचा सन्मान आहे. मराठी चित्रपटसृष्टीत उंबरठा ओलांडताना, हा केवळ आरंभ नसून दर्जेदार कथा सादर करण्याचा आमचा नवा संकल्प आहे.”

निर्माते अंकुर गर्ग म्हणाले, “देवमाणूस हा लव फिल्म्सच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. तेजस देऊस्कर यांचे प्रभावी दिग्दर्शन, तसेच महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि संपूर्ण टीमच्या दमदार कामगिरीमुळे हा चित्रपट प्रेक्षकांवर खोल प्रभाव टाकणार आहे. आम्ही या चित्रपटाचा भाग होण्याचा अभिमान बाळगतो आणि २५ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहोत. मराठी चित्रपटसृष्टीसाठी अधिक अर्थपूर्ण आणि आकर्षक चित्रपट देण्याचा आमचा निर्धार ‘देवमाणूस’मधून अधोरेखित होतो.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लव फिल्म्स प्रस्तुत, तेजस प्रभा विजय देऊस्कर दिग्दर्शित ‘देवमाणूस’, लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित, हा चित्रपट २५ एप्रिल २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.