Dilip Prabhavalkar’s Dashavatar Piracy : सध्या मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही एकाच सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे आणि तो म्हणजे ‘दशावतार’. दिलीप प्रभावळकर यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘दशावतार’चा सर्वत्र डंका वाजत आहे. बॉक्स ऑफिसवरदेखील हा सिनेमा कमाईचे अनेक विक्रम रचत आहे. चित्रपट समीक्षक, मराठी सिनेसृष्टी, प्रेक्षकांकडून या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

‘दशावतार’ सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असताना आणि प्रेक्षकांसह कलाकारही या सिनेमाच्या यशाचा आनंद साजरा करीत असतानाच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ‘दशावतार’ची पायरसी होत असल्याचं समोर येत आहे. त्याबाबत ‘दशावतार’मधील अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरने पोस्ट शेअर केली आहे. आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच याबद्दल एक विनंतीही केली आहे.

सोशल मीडियासह सर्वच क्षेत्रांतून ‘दशावतार’चं भरभरून कौतुक होत आहे. ‘दशावतार’मधील गाणी, संवाद, अभिनय, तसेच त्यातील अन्य तांत्रिक गोष्टींबद्दलही सिनेमाप्रेमी भरभरून बोलताना दिसत आहेत. मात्र, या कौतुकाला पायरसीचं ग्रहण लागलं आहे. त्याबद्दल प्रियदर्शिनीनं तिची नाराजी व्यक्त केली आहे.

इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये प्रियदर्शिनी म्हणते, “आपल्या ‘द‌शावतार’ चित्रपटाला तुम्हा रसिक प्रेक्षकांना उदंड प्रतिसाद मिळतोय, मराठी प्रेक्षकांची ताकद काय आहे, हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक चित्रपटगृहात दिसतंय. पण, त्याच वेळी काही लोक चित्रपटाची चोरून काढलेली प्रत फोनवर डाऊनलोड करू पाहत आहेत. चित्रपटाच्या या पायरसीविरुद्ध कारवाई सुरू आहेच. परं,तु आपल्याच माणसांनी आपल्या चित्रपटाबद्दल असं करणं दुःखद आहे.

त्यानंतर ती म्हणते, “चित्रपट हा चित्रपटगृहातच जाऊन बघण्याचा अनुभव आहे. त्यासाठी शेकडो लोकांची मेहनत आणि पैसा लागलेला आहे. निदान मराठी माणसांनी तरी अशा चोरटेपणाला थारा देऊ नये. स्वतःही अशी पायरेटेड प्रिंट फोनवर पाहू नये आणि इतरांनाही त्यापासून रोखावं,अशी विनंती. आपल्याच सह‌कार्यातून मराठी चित्रपट जगणार, तगणार आणि वाढणार आहे.”

प्रियदर्शिनी इंदलकर इन्स्टाग्राम स्टोरी
प्रियदर्शिनी इंदलकर इन्स्टाग्राम स्टोरी

‘दशावतार’मधून कोकणातील संस्कृती, परंपरा, तसेच कोकणातला नयनरम्य निसर्ग प्रेक्षकांना अनुभवायला मिळत आहे. त्याचबरोबर या सिनेमातून मांडण्यात आलेला विषयसुद्धा अनेकांना भावला आहे. त्यामुळे मराठीसह अनेक अमराठी प्रेक्षकसुद्धा या सिनेमाला गर्दी करताना दिसत आहेत.

Sacnilk च्या वृत्तानुसार, ‘दशावतार’चं आतापर्यंतचं बॉक्स ऑफिस कलेक्शन हे जवळपास सात कोटींच्या घरात पोहोचलं आहे. सिनेमानं पहिल्या तीन दिवसांतच जगभरात ५.२२ कोटींचा गल्ला जमावला होता. त्यानंतर सोमवारी १.१ कोटी आणि मंगळवारी दीड कोटी इतकी कमाई केली आहे. मात्र अशातच आता सिनेमाची पायरसी झाल्यानं, याचा कमाईवर काही परिणाम होईल का? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.