तात्या विंचू, चिंची चेटकीण, श्रीयुत गंगाधर टिपरे, चिमणराव… या आणि अशा अनेक भूमिकांना आपल्या सशक्त अभिनयातून जीवंत करणारे ज्येष्ठ अभिनेते म्हणजे दिलीप प्रभावळकर. वयाची ८० वर्षे पार केलेले दिलीप प्रभावळकर हे आजच्या नव्या पिढीसाठी जणू एक विद्यापीठच आहेत. दिलीप प्रभावळकर हे त्यांच्या अनेक भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. यापैकीच त्यांची कायम स्मरणात राहिलेली भूमिका म्हणजे ‘चौकट राजा’मधील नंदू.

‘चौकट राजा’ आणि दिलीप प्रभावळकर हे कधीही वेगळे न होऊ शकणारे समीकरण आहे. या चित्रपटात त्यांनी साकारलेली नंदू या मतिमंद मुलाची भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. आजही हा चित्रपट पाहताना अनेकांच्या डोळ्यांत अश्रू जमा होतात. मराठीमधील कल्ट सिनेमांच्या यादीत ‘चौकट राजा’चं नाव आवर्जून घेतलं जातं. याच सिनेमाबद्दल दिलीप प्रभावळकरांनी नुकताच एक किस्सा सांगितला आहे.

‘चौकट राजा’मधील एक सीन दादरच्या स्मशानभूमीत चित्रीत करण्यात आला असून या सीनवेळी चक्क खरं प्रेत सोडून लोक चित्रीकरण बघायला आले होते. लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत दिलीप प्रभावळकरांनी हा किस्सा सांगितला. याबद्दल ते म्हणाले, “चित्रपटात आईला अग्नी देतानाचा सीन आहे; तो दादरच्या स्मशानभूमीत केला होता. तो सीन आधी रवींद्र नाट्यमंदिर इथे चित्रीत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण तेव्हा आजूबाजूच्या बिल्डिंग दिसत होत्या. त्यामुळे ते सगळं खोटं वाटत होतं. मग स्मिता तळवकर म्हणाली, आपणं हा सीन खऱ्या स्मशानभूमीत करू. मग आम्ही दादरच्या स्मशानभूमीत हा सीन शूट केला.”

यानंतर दिलीप प्रभावळकर म्हणाले, “इतर वेळी रस्ता, दुकान अशा ठिकाणी शूटिंग करताना असिस्टंट्स वगैरे रहदारी किंवा ट्रॅफिक थांबवतात. स्मशानभूमीत मात्र असं कुणाला थांबवता येत नाही. त्यामुळे त्यात अनेकजण येतच होते. तेव्हा एक प्रेत तिथे आणलेलं होतं आलं आणि ते सोडून सगळे लोक शूटिंग बघायला आले. शेवटी मला काहींना सांगावं लागलं की, तुम्ही तिकडे जा आणि ते सगळं करा. हा खराखुरा प्रसंग आहे.”

दरम्यान, दिलीप प्रभावळकर हे लवकरच ‘दशावतार’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटातून दिलीप प्रभावळकरांचा एक वेगळाच लूक पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या चित्रपटातील लूकची सोशल मीडियार चर्चा सुरू आहे. नुकताच त्यांच्या वाढदिवसानिमित्त सिनेमाचा टीझर शेअर करण्यात आला आणि हा टीझर अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.

गेल्या चार दशकांहून अधिक काळ ते मनोरंजनसृष्टीत कार्यरत आहेत आणि प्रत्येक भूमिकेतून स्वत:च वेगळेपण सिद्ध केलं आहे. अशातच आता ‘दशावतार’ या चित्रपटात तर ते वेगळ्याच अंदाजात दिसणार आहेत.