मराठी मनोरंजन विश्वातील ‘हँडसम हंक’ अशी ओळख मिळवणारा अभिनेता म्हणजे गश्मीर महाजनी. गश्मीर दिवंगत अभिनेते रवींद्र महाजनी यांचा मुलगा आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत गश्मीरने मनोरंजन विश्वात आपली कारकीर्द सुरू केली. त्याने आजवर अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये तसेच चित्रपटांमध्ये काम केलं. आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली.
मालिका, सिनेमासह गश्मीर ओटीटीवरील वेबसीरिजमधूनही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याचबरोबर काही रिअॅलिटी शोमध्येही तो झळकला आहे. आपल्या अभिनय आणि नृत्य कौशल्याने चर्चेत राहणारा हा अभिनेता सोशल मीडियावरही तितकाच सक्रीय असतो.
गश्मीर सोशल मीडियावर त्याचे अनेक फोटो-व्हिडीओ आणि कामानिमित्तची माहिती शेअर करताना दिसतो. तसंच याच सोशल मीडियाच्या माध्यमातून तो अनेकदा चाहत्यांशी संवाद साधतो. त्यांच्या अनेक प्रश्नांवर तो मोकळेपणाने उत्तर देतो. अशातच त्याने त्याने इन्स्टाग्रामद्वारे Ask Me च्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला.
‘Ask Gash’ या प्रश्नोत्तरांच्या सत्रामधून तो चाहत्यांच्या काही प्रश्नांची उत्तरं देत असतो. या प्रश्नोत्तरांच्या सत्रादरम्यान त्याला एका चाहत्याने ‘आजकाल प्रसिद्धी मिळवायची असेल तर कुठलातरी वाद हवाच असतो… मात्र अशात तू या वादांपासून स्वतःला कसं दूर ठेवतोस?’ असा प्रश्न विचारला.
चाहत्याच्या या प्रश्नाचं उत्तर देत गश्मीर म्हणाला, “मी फक्त सोशल मीडियापासून दूर राहतो आणि पॉडकास्टसुद्धा करत नाही… खरंच सांगतो, वादविवादांपासून दूर राहण्यासाठी हेच योग्य आहे.” दरम्यान, याच ‘Ask Gash’ च्या माध्यमातून त्याने ‘बिग बॉस’ या शोमध्ये येणार असल्याची इच्छासुद्धा व्यक्त केली. ‘बिग बॉस’मध्ये सहभागी होण्याचा काही विचार आहे का? असा प्रश्न विचारताच गश्मीरने ‘हो मला ते करायचं आहे’ असं म्हटलं.

गश्मीरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्याने ‘देऊळबंद’, ‘कॅरी व मराठा’, ‘कान्हा’, ‘धर्मवीर’, ‘सरसेनापती हंबीरराव’ आणि गेल्यावर्षी आलेल्या ‘फुलवंती’ सिनेमात मुख्य भूमिका केल्या आहेत. मलिका, सिनेमाशिवाय गश्मीरने रिअॅलिटी शोमध्येही सहभाग घेतला आहे. ‘झलक दिखला जा’ आणि ‘खतरों के खिलाडी’सारख्या शोमधूनही त्याने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.