ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचा मृतदेह १५ जुलै रोजी पुणे जिल्ह्यातील आंबी गावातील एका फ्लॅटमध्ये आढळला होता. ते त्या घरात तीन दिवस मृतावस्थेत पडून होते, अशी माहिती पोलिसांनी दिली होती. घरातून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवलं. त्यानंतर पोलीस घटनास्थळी आले व त्यांनी त्यांचा मुलगा अभिनेता गश्मीर महाजनीला निधनाबद्दल माहिती दिली.

रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर गश्मीरला खूप ट्रोल करण्यात आलं. वडील एकटेच राहत होते, त्यांच्या निधनाबद्दल मुलालाही दोन दिवस माहीत नव्हतं, त्यामुळे त्याच्यावर टीका झाली. गश्मीरने मात्र यावर काहीच थेट भाष्य केलं नाही. नुकतंच त्याने सिनेपत्रकार सौमित्र पोटे यांच्या ‘मित्र म्हणे’ या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. या मुलाखतीदरम्यान गश्मीरने या एकूण प्रकरणावर प्रकाश टाकला. ज्या गोष्टी आजवर फक्त गश्मीरला ठाऊक होत्या त्याबद्दल त्याने या पॉडकास्टमध्ये खुलासा केला आहे.

आणखी वाचा : रवींद्र महाजनी यांच्यासाठी केअरटेकर का ठेवला नाही? अभिनेता गश्मीर महाजनीने दिलं स्पष्ट उत्तर

रविंद्र महाजनी एकटे राहत होते, त्यांची काळजी घेणारी कोणतीही व्यक्ती किंवा एखादा केअरटेकर त्यांच्या कुटुंबियांनी ठेवला नव्हता असे आरोप गश्मीर आणि त्यांच्या कुटुंबावर करण्यात आले होते. या आरोपांचं गश्मीरने खंडन केलंच आहे पण याबरोबरच त्याने त्याच्या आणि वडिलांच्या नात्यावरही प्रकाश टाकला आहे. मध्यंतरी एक काळ असा होता जेव्हा रवींद्र महाजनी यांनी गश्मीरचा नंबर ब्लॉक केला होता. असं त्यांनी नेमकं का केलं असावं याबद्दल गश्मीरने भाष्य केलं आहे.

या मुलाखतीमध्ये तो म्हणाला, “माझे वडील २२ वर्षांपासून वेगळे राहायचे. त्यांना तशीच सवय होती, पण जेव्हा माझा लहान मुलगा मोठा होऊ लागला तेव्हा मला असं वाटायचं की त्याला तरी त्याच्या आजोबांचा सहवास लाभावा. त्यांनी भले आमच्यापासून वेगळं व्हायचं ठरवलं असलं तरी माझ्या मुलाबरोबर त्यांनी काही क्षण घालवावे असं वाटायचं. मी त्यांना माझ्या लहान मुलाचे फोटोज व्हिडीओजसुद्धा पाठवायचो, काही दिवस त्यांनी ते पाहिलं अन् मग माझा नंबरच ब्लॉक करून टाकला.”

View this post on Instagram

A post shared by Soumitra Pote (@soumitrapote)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे गश्मीर म्हणाला, “मला असं वाटतं की ते हळवे झाले होते. त्यांना पुन्हा या साऱ्या संसारात अडकायची कुठेतरी भीती वाटत असेल म्हणूनच त्यांनी मला ब्लॉक केलं असावं असा माझा अंदाज आहे. माझे वडील अजिबात कठोर किंवा निर्दयी नव्हते. ते या सगळ्या बंधनात अडकतील याची त्यांना भीती होती असा बहुतेक त्यांच्या डोक्यात विचार सुरू असावा.”

या मुलाखतीमध्ये गश्मीरने अशा बऱ्याच गोष्टींचा उलगडा केला. शिवाय त्याला या सगळ्या प्रकरणामुळे झालेला त्रास आणि सोशल मीडियावरील लोकांच्या कॉमेंट यावारही गश्मीर मानमोकळेपणे भाष्य केलं आहे.