Gautami Patil on Vaishnavi Hagawane Death Case: पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणावर गौतमी पाटीलने प्रतिक्रिया दिली आहे. हगवणे कुटुंबाने बैलासाठी आयोजित केलेल्या जंगी कार्यक्रमात गौतमी पाटीलला बोलावण्यात आलं होतं. बैलासमोर गौतमी पाटीलने डान्स केला होता, त्या डान्सचा व्हिडीओही वैष्णवीच्या मृत्यूनंतर चांगलाच व्हायरल झाला होता. अखेर गौतमीने या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. वैष्णवी हगवणेबरोबर जे घडलं ते दुर्दैवी असल्याचं गौतमीने म्हटलंय.

“वैष्णवी हगवणेबरोबर जे झालं ते दुर्दैवी आहे. मी तिच्या बाजूने आहे. मला आपल्या न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. या प्रकरणात जो दोषी असेल, त्याला कठोर शिक्षा व्हायला हवी, एवढंच म्हणेन,” असं गौतमी तिची बाजू मांडताना म्हणाली.

आम्ही फक्त कला सादर करतो – गौतमी पाटील

वैष्णवीच्या मृत्यूनंतर कार्यक्रमातील गौतमीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, त्याबद्दल विचारलं असता गौतमी म्हणाली, “ही घटना खूप दुःखद आहे. आम्ही कलाकार आहोत, आम्ही अनेक गावांमध्ये कार्यक्रम करतो, पुढे काय होईल ते आम्हाला माहीत नसतं. कार्यक्रमाबद्दल जास्त विचारपूस करणं आमचं काम नाही. आम्ही कला सादर करतो. मी लावणी, डान्स करते. आमचे इतर कलाकार आहेत, माझी टीम हे कार्यक्रम मॅनेज करते. कार्यक्रम घेण्याचे काम माझी टीम करते.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कार्यक्रमाचे पूर्ण मानधन मिळाले – गौतमी पाटील

“मला त्या कार्यक्रमाचे पूर्ण मानधन मिळाले होते. कार्यक्रम छान झाला होता, सगळं व्यवस्थित झालं. पण आता त्या कार्यक्रमाचे व्हिडीओ व्हायरल होत आहे. मी व्हिडीओ पाहिल्यावर हे काय आहे, असा विचार मला आला. मला वाटलं की कोणी जुना व्हिडीओ चुकून टाकला असेल, त्यावेळी मला माहीत नव्हतं. पण नंतर मला सगळं समजलं, मी त्याबद्दल विचारपूस केली, तेव्हा आमच्या टीमने सांगितलं. आम्ही कलाकार आहोत, आम्हाला त्या गोष्टींमध्ये सहभागी करून घेऊ नका, आम्ही फक्त तिथे कला सादर केली होती, बाकी काही नाही,” असं गौतमी पाटीलने स्पष्ट केलं.