Genelia Deshmukh Ved 2 Movie : २०२३ मध्ये आलेल्या रितेश देशमुखच्या ‘वेड’ या मराठी चित्रपटाने अनेक प्रेक्षकांना वेड लावलं होतं. या चित्रपटाद्वारे रितेश दिग्दर्शनात पदार्पण केलं होतं. शिवाय याच चित्रपटातून त्याची पत्नी आणि अभिनेत्री जिनिलीयाने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. ‘वेड’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई तर केलीच; शिवाय अनेक पुरस्कार सोहळ्यांमध्येही आपलं वर्चस्व गाजवलं. ‘वेड’ हा चित्रपट २०१९ मध्ये आलेल्या ‘मजिली’ या चित्रपटाचा रिमेक होता.
‘वेड’ चित्रपटातील गाणी, संवाद तसंच रितेश-जिनिलीया यांच्यातील केमिस्ट्रीमुळे आजही हा चित्रपट अनेकांचा आवडता आहे. ‘वेड’च्या भरघोस यशानंतर अनेकांनी रितेशला या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाबदल विचारणा केली होती. अशातच आता स्वत: जिनिलीयाने ‘वेड २’बद्दल प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्रीने नुकत्याच एका मुलाखतीत ‘वेड २’वर काम सुरू असून लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं म्हटलं आहे.
‘वेड २’बद्दल ‘मिरर’शी साधलेल्या संवादात जिनिलीया देशमुख म्हणाली, “सध्या मी आणि रितेश… आम्ही दोघंही आमच्या वैयक्तिक प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र आहोत. पण वेळ मिळाल्यावर आम्ही नक्कीच पुन्हा एकत्र काम करू. ‘वेड २’ ठरलेलंच आहे! त्याला थोडा वेळ लागू शकतो, कदाचित एक किंवा दोन वर्ष. पण प्रेक्षक सतत याबद्दल विचारत असतात; त्यामुळे हा चित्रपट नक्की होणार.”
रितेश देशमुख इन्स्टाग्राम पोस्ट
यापुढे तिने असंही सांगितलं की, “‘वेड’ फक्त प्रेक्षकांच्याच नव्हे; तर आमची मुलं रिआन आणि राहील यांच्याही खूप पसंतीस उतरला. आम्ही त्यांना ‘वेड’ आणि ‘धमाल’ हे चित्रपट दाखवले आहेत. पण त्यांनी अजून ‘जाने तू… या जाने ना’ चित्रपट पाहिलेला नाही. अलीकडेच आम्ही त्यांना ‘सितारे जमीन पर’ चित्रपटही दाखवला. हा चित्रपट संवेदनशील असल्यामुळे मी तो ठरवून त्यांना दाखवला.”
‘वेड’ या सिनेमाची घोषणा झाल्यापासूनच अनेक प्रेक्षक मंडळी आणि रितेश-जिनिलीया यांचे अनेक चाहतेही या सिनेमासाठी उत्सुक होते. कोरोनानंतर अधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांपैकी ‘वेड’ हा एक होता. ‘वेड’ने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी २.२५ कोटींची कमाई केली होती. सुरुवातीलाच दणदणीत कमाई करणाऱ्या या सिनेमाने नंतर बॉक्स ऑफिसवर एकूण ७५ कोटींचा गल्ला जमवला होता.
दरम्यान, रितेश देशमुख लवकरच दिग्दर्शक म्हणून त्याचा दुसरा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यात जिनिलीयाने ‘वेड २’बद्दल खुशखबर दिली आहे. त्यामुळे आगामी काळात त्यांच्या चाहत्यांना मनोरंजनाची चांगलीच पर्वणी असणार आहे.