Riteish Deshmukh : मराठीसह बॉलीवूड कलाविश्वात रितेश देशमुखचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व होस्ट केल्यापासून अभिनेत्याला घराघरांत रितेश भाऊ ही नवीन ओळख मिळाली. रितेशचा अभिनय, त्याचे संस्कार, देशमुख कुटुंबीय याची चर्चा कायमच सोशल मीडियावर होत असते.
याशिवाय अभिनेता नेहमीच त्याच्या चाहत्यांचा आदर करताना दिसतो. रितेशचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये अभिनेत्यासमोर एक लहान मुलगी ‘वेड’ सिनेमातील गाजलेलं गाणं सादर करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
रितेश नुकताच लातूरला गेला होता. यावेळी एका बालगायिकेने त्याची भेट घेतली. या बालगायिकेचं नाव भक्ती पाटील असं आहे. रितेशसमोर या मुलीने सुरेल आवाजात ‘सुख कळले’ गाणं सादर केलं. भक्तीचा मंत्रमुग्ध करणारा आवाज ऐकताच रितेश भारावून गेला होता. भक्तीने गाणं सादर केल्यावर अभिनेत्याने टाळ्या वाजवल्या, “वाह वाह…” म्हणत तिला शाबासकी देत तिचं कौतुकही केलं.
यावेळी भक्तीने रितेशची भेट घेऊन त्याचे आशीर्वाद घेतले. याचबरोबर तिने अभिनेत्याचा ऑटोग्राफ सुद्धा घेतला. भक्तीला बालपणापासूनचं गायनाची आवड आहे. तिचा रितेशबरोबरचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
“अहोभाग्य… रितेश देशमुख यांच्यासमोर त्यांच्याच सिनेमाचं गाणं गायला मिळालं”, “नशिबवान आहेस तू पोरी”, “खूप छान आवाज आहे बाळा तुझा”, “किती गोड आवाज आहे या मुलीचा”, “रितेशला पुढच्या चित्रपटासाठी गायिका भेटली”, “एकदम सुंदर आवाज असणारी ‘भक्ती” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत. सध्या भक्तीचा हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे.
दरम्यान, जिनिलीया व रितेश देशमुख यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘वेड’ चित्रपट ३० डिसेंबर २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. याशिवाय ‘वेड’मधील सगळीच गाणी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरली होती. चित्रपटात सत्या जेव्हा श्रावणीचा स्वीकार करतो यादरम्यान असलेलं ‘सुख कळले’ गाणं प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रिय ठरलं. विशेषत: अनेक लग्नसोहळ्यांमध्ये, सोशल मीडियावरील रोमँटिक रील्स व्हिडीओला हे गाणं लावलं जातं. चित्रपट रिलीज झाल्यावर अडीच वर्षे उलटली असली तरीही ‘सुख कळले’ गाण्याची लोकप्रियता कायम आहे.