Hruta Durgule’s Husband Prateek Shah Share’s A Post : आपल्या सहजसुंदर अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे. हृता मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आजवर तिने अनेक मालिका, चित्रपटांतून काम करीत तिच्या अभिनयाने अनेकांची पसंती मिळवली. अशातच नुकताच तिला काल (५ ऑगस्ट) पार पडलेल्या ‘महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार’ सोहळ्यात पुरस्कार मिळाला. त्यानिमित्त तिच्या नवऱ्यानं सोशल मीडियावर पोस्ट करीत बायकोचं कौतुक केलं आहे.

हृता दुर्गुळेनं ‘अनन्या’ चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यापूर्वी अभिनेत्रीने ‘दूर्वा’, ‘फुलपाखरू’ यांसारख्या मालिकांत काम केलं होतं. तिच्या ‘फुलपाखरू’ मालिकेतून ती खऱ्या अर्थानं प्रसिद्धीझोतात आली. त्यानंतर अभिनेत्रीनं रवी जाधव यांच्या ‘अनन्या’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारली. अशातच आता तिला ‘महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार’ सोहळ्यात ‘अनन्या’साठी सर्वोत्कृष्ट पदार्पण हा पुरस्कार मिळाला आहे. त्यानिमित्त अभिनेत्रीच्या नवऱ्यानं तिच्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

हृता दुर्गुळेचं नवऱ्याकडून कौतुक

हृता दुर्गुळेचा नवरा दिग्दर्शक प्रतीक शाहनं इन्स्टाग्रामवर बायकोचा फोटो पोस्ट केला आहे. यावेळी अभिनेत्रीच्या हातात पुरस्कार असल्याचं दिसतं. प्रतीकनं पोस्टला खास कॅप्शनही दिली आहे. यावेळी त्यानं लिहिलं आहे, “महाराष्ट्र राज्य सर्वोत्कृष्ट पदार्पण हा पुरस्कार तुला मिळाल्याननिमित्त अभिनंदन. मला तुझा खूप अभिमान आहे. तुला अपेक्षा आहे त्याहीपेक्षा तू खूप पुढे जाणार आहेस. माझी सुपरस्टार.”

‘महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार’ सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पदार्पण हा पुरस्कार मिळाल्यानंतर अभिनेत्रीनेही सोशल मीडियावर पोस्ट केली होती. अभिनेत्रीनं यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक प्रताप फड यांचं कौतुक करीत आभार मानले आहेत. ‘अनन्या’च्या दिग्दर्शकांबद्दल हृता म्हणाली, “तुम्हाला पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाल्यानिमित मला खूप आनंद होत आहे. मला अनन्या हा चित्रपट दिल्याबद्दल मी कायम तुमची ऋणी राहीन. तुमच्याशिवाय हे शक्य झालं नसतं. माझा प्रत्येक पुरस्कार तुम्हला समर्पित असेल.” पुढे तिनं चित्रपटाचे निर्माते रवी जाधव यांचेही आभार मानले आहेत.

प्रताप फड दिग्दर्शित ‘अनन्या’ चित्रपट २२ जुलै २०२२ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातून हृतानं अभिनेत्री म्हणून, तर प्रताप फड यांनी दिग्दर्शक म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. लोकप्रिय निर्माते, दिग्दर्शक रवी जाधव यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती. अशातच आता चित्रपटाला महाराष्ट्र राज्याचा पुरस्कार मिळाल्यानं याचे निर्माते, दिग्दर्शक व कलाकार यांच्या मेहनतीचं चीज झालं आहे, असं म्हणता येईल.