When will Hruta Durgule work on television: ‘दुर्वा’, ‘फुलपाखरु’, ‘मन उडू उडू झालं’, अशा मालिकांतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री हृता दुर्गुळे सध्या चित्रपटांतदेखील विविध भूमिका साकारताना दिसत आहे.

‘कन्नी’, ‘सर्किट’, ‘टाइमपास ३’, ‘अनन्या’, अशा चित्रपटांतून हृताने प्रेक्षकांची मने जिंकली. आता ती लवकरच ‘आरपार’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ललित प्रभाकर तिच्याबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे. आता चित्रपट प्रदर्शित होण्याआधी सध्या हे कलाकार प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. त्यांची विविध मुलाखतींमधील वक्तव्ये सध्या लक्ष वेधून घेताना दिसत आहेत.

हृता दुर्गुळे काय म्हणाली?

हृता दुर्गुळे आणि ललित प्रभाकर यांनी नुकतीच सकाळ प्रिमिअरला मुलाखत दिली. या मुलाखतीत हृताला ती टेलिव्हिजनवर पुन्हा कधी करताना दिसणार, असा प्रश्न विचारला. त्यावर अभिनेत्री म्हणाली, “मला असं वाटतं की मी १० वर्षे टेलिव्हिजनवर काम केलं आहे. तर तितकी कमिटमेंट मी सद्यस्थितीत देऊ शकणार नाही. कारण- एक कलाकार आणि एक माणूस म्हणून विविध गोष्टी करुन पाहायच्या आहे. कलेच्या विविध क्षेत्रात काम करायचे आहे.”

“आधी टेलिव्हिजनवर काम करताना माझा उद्देश वेगळा होता. तर, आता मला असं वाटतंय की तितक्या प्रामाणिक उद्देशाने मी तिथे काम करू शकत नाही. असं होत नाही की मला फोन येत नाहीत किंवा भूमिकेसाठी विचारलं जात नाही. टेलिव्हिजनवर काम करायला मला आवडतं. पण, ते व्यावहारिकदृष्ट्या सध्या शक्य नाहीये. कारण-एका माणसाला अॅडजस्ट करण्यासाठी ६०-७० लोकांच्या युनिटला त्रास सहन करावा लागतो”, असे म्हणत हृताने वेळ आणि तारखा यांमुळे सध्या टेलिव्हिजनवर काम करणे शक्य नसल्याचे सांगितले .

तसेच ‘नवशक्ती’ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने ललित प्रभाकरबरोबर काम करण्याचा अनुभवदेखील सांगितला. ललितबरोबर काम केल्यानंतर त्याच्याइतर उत्तम सहकलाकार कोणी असू शकत नाही, असे अभिनेत्रीने वक्तव्य केले.

दरम्यान, आरपार हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या गाण्यांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे, आता चित्रपटालादेखील तसाच प्रतिसाद मिळणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणा आहे.