हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. ‘झिम्मा’चा पहिला भाग २०२१ मध्ये प्रदर्शित झाला होता त्यावेळी या सगळ्या बायका लंडन ट्रिपला गेल्या होत्या. आता ‘झिम्मा २’च्या निमित्ताने या सात बायकांच्या रियुनियनची गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळाली. २४ नोव्हेंबरला प्रदर्शित झालेल्या ‘झिम्मा २’ चित्रपटाने १४ कोटींहून अधिक कमाई केली आहे. हिंदीत बड्या सेलिब्रिटींचे सिनेमे प्रदर्शित झालेले असताना मराठी चित्रपटाला एवढं भरभरून प्रेम मिळतंय हे पाहून ‘झिम्मा २’च्या दिग्दर्शकासह अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने खास पोस्ट शेअर केली आहे.
हेमंत व सिद्धार्थने त्यांच्या पोस्टमध्ये एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ‘अॅनिमल’, ‘डंकी’, ‘सालार’, ‘सॅम बहादूर’ या हिंदी चित्रपटांसह ‘झिम्मा २’चं पोस्टर झळकत असल्याचं पाहायला मिळत आहे. हे दृश्य पाहून दिग्दर्शकासह अभिनेत्याने पोस्ट लिहित समाधान व्यक्त केलं आहे.
हेमंत ढोमे लिहितो, “आपल्या ‘झिम्मा २’चा सगळा लढा, सारं यश या फोटोत आहे. ५ व्या आठवड्यात पदार्पण करत असताना आपल्या सिनेमाने या बलाढ्यांसह उभं ठाकून आपला हक्काचा प्रेक्षक चित्रपटगृहात आणला आणि त्यांना आनंद दिला! अजून काही वर्षांनी हाच फोटो बघून चेहेऱ्यावर समाधानाचं हसू असेल! अनेक साऱ्या आठवणींचा साठा असेल, आपण केलेल्या कामाचं समाधान असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रचंड अभिमान असेल! बास अजून काय पाहिजे? याचं सगळं श्रेय तुमचंच… तुम्हीच कर्ते करविते! खूप खूप धन्यवाद!”
हेमंतप्रमाणे या चित्रपटात कबीरची भूमिका साकारणाऱ्या सिद्धार्थ चांदेकरने सुद्धा पोस्ट शेअर करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. “या फोटोत सगळं काही आलंय. पाच आठवडे ताठ मानेनं लढत आलेला आपला झिम्मा २! मोठ्या सिनेमांनी दबाव आणण्याचा प्रयत्न केला का? तर केला. शो कमी झाले का? तर झाले. पण केवळ आणि केवळ प्रेक्षकांच्या प्रेमाची ताकद, आणि एक सुंदर गोष्ट प्रेक्षकांना सांगण्याचा आमचा प्रयत्न यशस्वी ठरला…अजून अनेक मोठे सिनेमे येऊन ठाकलेत. येऊदे! तुमचं प्रेम असंच टिकलं तर तुमचा ‘झिम्मा २’ पण टिकेल. आणि तुम्हाला ‘आयुष्य सुंदर आहे’ हे पुन्हा एकदा पटवून देणारे चित्रपट आम्ही बनवणं थांबवणार नाही. मराठी चित्रपटांवर प्रेम करणाऱ्या माझ्या सर्व प्रेक्षकांचे खूप आभार! मनापासून.” असं सिद्धार्थने त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान , ‘झिम्मा २’बद्दल सांगायचं झालं तर यामध्ये सिद्धार्थ चांदेकरसह सुचित्रा बांदेकर, सुहास जोशी, निर्मिती सावंत, क्षिती जोग, रिंकू राजगुरू, सायली संजीव, शिवानी सुर्वे या अभिनेत्रींनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.