जितेंद्र जोशी मराठी सिनेसृष्टीतला आघाडीचा अभिनेता आहे. आपल्या दमदार अभिनयाने जितेंद्रने मराठी मनोरंजन क्षेत्रात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मराठीप्रमाणे बॉलीवूडमध्ये जितेंद्रने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. सोशल मीडियावर जितेंद्र नेहमी सक्रिय असतो. व्हिडीओ आणि पोस्टच्या माध्यमातून तो आपले मत मांडत असतो. दरम्यान एका मुलाखतीत जितेंद्रने आईबाबात भाष्य केलं आहे.
जितेंद्रने राजसी मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत जितेंद्रने त्याच्या आईबाबतच्या भावना व्यक्त केल्या आहेत. जितेंद्र त्याच्या आईच्या खूप जवळ आहे. जितेंद्रच्या आईचं नाव शकुंतला जोशी आहे. आपल्या नावसमोर नेहमी तो आईचे नाव लावतो. सोशल मीडियावर किंवा अनेक मुलाखतींमध्ये जितेंद्र आपल्या आईबद्दल भरभरुन बोलतो. दरम्यान या मुलाखतीत त्याने आईला कोणत्या नावाने हाक मारतो याबाबतचा खुलासा केला आहे.
जितेंद्र म्हणाला, “माझी आई माझी आईपण आहे आणि बापपण आहे. मी तिला आबा म्हणतो. आई आणि बाप दोन्ही. तिच्यासारखी दुसरी बाई मी पाहिली नाही. खूप सुंदर बाई आहे. प्रत्येकाला आपली आई आवडत असते. मलाही माझी आई आवडते. मी तिच्याशी भांडतोही आणि प्रेमही करतो. पण ती आता हळू हळू म्हातारी होत आहे. मला काळजी वाटते तिची. माझी आई खमकी आणि स्वावलंबी बाई आहे. स्वत:च्या पायावर उभी राहिली. ती खूप भावनिक आहे आणि तिच्यातील भावनिक गुण माझ्यात आला.”
जितेंद्र जोशीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर मराठी बरोबर बॉलीवूड चित्रपटांमध्येही त्याने अनेक दमदार भूमिका साकारल्या आहेत. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त गोदावरी चित्रपटातील त्याची भूमिका चांगलीच गाजली. या चित्रपटात त्याच्याबरोबर विक्रम गोखलेंची मुख्य भूमिका होती. आता त्याचा नाळ चित्रपट १० नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.