Jitendra Joshi Shared A Special Post On His Daughter’s Birthday : जितेंद्र जोशी मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता आहे. आजवर त्याने अनेक चित्रपटांतून वैविध्यपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. जितेंद्र जोशी त्याच्या व्यावसायिक आयुष्यामुळे बऱ्याचदा चर्चेत असतो. अशातच आता अभिनेत्याने सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली आहे. ही पोस्ट त्याने त्याच्या खासगी आयुष्यातील एका महत्त्वाच्या व्यक्तीसाठी केली आहे.

जितेंद्र जोशीने त्याची लेक रेवाच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. जितेंद्र जोशी सोशल मीडियावर फार मोठ्या पोस्ट लिहिताना दिसत नाही. परंतु, आज लेकीच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. जितेंद्रने त्याची लेक रेवाचे काही फोटोसुद्धा यावेळी शेअर केले आहेत.

जितेंद्रने रेवाचे काही फोटो पोस्ट करत त्यांना कॅप्शन देत असे म्हटले, “पहिल्या चित्रफितीमध्ये इच्छा आणि शेवटच्या छायाचित्रात वास्तव आहे; दोन्हींच्या मध्ये काळ एकेका क्षणाचा दिवस, दिवसाचा आठवडा, महिना, वर्ष बनून / बदलून सरताना मनात मात्र काही क्षण रेंगाळत राहतात.”

जितेंद्र पुढे म्हणाला, “मुलगी जन्माला आली की, नवा श्वास मिळतो, छातीचा भाता आणखी मोठ्ठा होतो. स्वप्नातसुद्धा वाटणार नाही अशा गोष्टी आयुष्यात घडतात. काम, पुरस्कार, मान, प्रतिष्ठा सगळं एकीकडे आणि एका मुलीचा बाप होणं एकीकडे. पालक होण्याचं सुख आपल्याला मुलंच देतात. आपल्यालाही ते घेता आलं पाहिजे. मुलांच्या वयाइतकंच पालकांचं वय असतं हे आपणसुद्धा ओळखलं पाहिजे”.

“मुलं पालकांना जबाबदारी शिकवतात. नवीन विचार देतात. मुलांचा वाढदिवस म्हणजे पालकांचाही जन्मदिवस. मुलं वाढतातच; पण पालकसुद्धा मोठे होतात. ते शहाणे झाले तर उत्तमच! पण मुलांना, मोठी होऊ नकोस, तशीच राहा वगैरे नको बालिशपणा! त्यापेक्षा मस्त जे वाटेल, जो वाट्टेल तो रस्ता मुलांना धरू द्यावा आणि जमलंच तर साथ द्यावी. १५ वर्षं अशी बघता बघता निघून गेली. पुढचीसुद्धा जातील. जन्मदिन चिरायू होवो! वाढदिवसाच्या शुभेच्छा!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जितेंद्रने लेकीसाठी केलेल्या या पोस्टखाली पर्ण पेठे, मंजिरी ओक, प्राजक्त देशमुख या मंडळींनी कमेंट्स केलेल्या पाहायला मिळत आहेत. तर त्याच्या या पोस्टखाली त्याची लेक रेवानेही ‘लव्ह यू बाबा’, अशी कमेंट केलीये. त्यासह त्याच्या काही चाहत्यांनी अभिनेत्याच्या मुलीला कमेंट्स करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.