Kedar Shinde Talk About Working With Lakshmikant Berde : मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय दिग्दर्शकांच्या यादीत येणारं नाव म्हणजे केदार शिंदे. आजवर त्यांनी अनेक नाटक, मालिका व चित्रपट अशा माध्यमांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. आजवरच्या या करिअरमध्ये अनेकदा चढ-उतार आल्याचं त्यांनी स्वत: सांगितलं आहे. स्वत:चं करिअर करताना त्यांनी खूप संघर्ष केला आहे आणि यशही पाहिलं आहे.
केदार शिंदेंनी त्यांच्या आयुष्याच्या सोप्या आणि कठीण काळात पत्नी बेलाचीही तितकीच साथ मिळाल्याचं म्हटलं आहे. सोशल मीडियावरील पोस्टमधून त्यांनी पत्नीबद्दलच्या भावना वेळोवेळी व्यक्त केल्या आहेत. अशातच आता एका मुलाखतीत केदार शिंदे यांनी त्यांचे लग्न झाल्यानंतरचे चार दिवस कसे होते. त्या काळात पत्नी बेला शिंदे यांची मनस्थिती काय होती? याबद्दलची माहिती दिली आहे.
केदार शिंदेंनी ‘अनुरूप विवाह संस्था’ला दिलेल्या मुलाखतीत केदार शिंदे म्हणाले, “९ मे १९९६ ला आम्ही लग्न केलं. त्या दिवशी सकाळीसुद्धा आम्हाला माहीत नव्हतं की, आम्ही लग्न करणार आहोत. त्याआधी माझं ७ मे १९९६ रोजी राज्य नाट्य स्पर्धेसाठीचं अंतिम फेरीचं नाटक रवींद्र नाट्य मंदिर येथे होतं. ते नाटक बघण्यासाठी बेला आली होती. त्या नाटकाच्या मध्यंतरापर्यंत ती तिथे होती. मध्यांतरात ती मला भेटायला आली नाही तेव्हा मी मित्रांना विचारलं तेव्हा सगळे म्हणाले की, मला त्रास नको होईल म्हणून ती भेटायला नाही आली.”
पुढे ते सांगतात, “नाटक संपल्यानंतरही ती भेटायला आली नाही. तेव्हा मला कळलं की, तिच्या घरच्यांनी तिला चालू नाटकातून घरी नेले आहे. मग मला टेंशन आलं की, आता तिच्याशी संपर्क कसा साधायचा. त्यात मला आयुष्यातलं अभिनेता म्हणून पहिलं शूटिंग मिळालं होतं, तेसुद्धा लक्ष्मीकांत बेर्डेंबरोबर. तेव्हा माझ्याकडे पेजर होता. त्यावर मी तिला शिवडीला तालीम आहे; तिथे तू ये, असं सांगितलं. त्यानंतर जेव्हा ती आली, तेव्हा मला म्हणाली की, आपण आता हे सगळंच थांबवूया. तेव्हाच मी तिला लग्नासाठी विचारलं आणि उद्याच लग्न करू, असं म्हटलं.
त्यानंतर केदार शिंदे सांगतात, “दुसऱ्या दिवशी सकाळी माझं शूटिंग होतं. त्या रात्री मी लक्ष्मीकांत बेर्डेंना फोन करून सांगितलं. तेव्हा ते फक्त ओके म्हणालेले. त्यानंतर पुढच्या दिवशी मी बाबा (शाहीर साबळे) यांच्यासमोर बेलाला बसवलं आणि आम्हाला लग्न करायचंय, असं सांगितलं. तेव्हा तिच्याकडे कोणतंही ओळखपत्र नसल्यानं हिच्याबरोबर घरी जाऊन तिला परत आणण्याची जबाबदारी अंकुश चौधरीकडे देण्यात आली. त्यानंतर ती घरी जाऊन सगळे सर्टिफिकेट आदी घेऊन आली, मग आम्ही बांद्रा कोर्टात जाऊन लग्न केलं.”
पुढे केदार शिंदे म्हणाले, “१२ मे रोजी महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सव होता, त्यात मी सादरीकरण करणार होतो. तेव्हा मी त्या कार्यक्रमाला बेलाला घेऊन गेलो आणि लक्ष्मीकांत बेर्डेंना तिला भेटवलं. तेव्हा लक्ष्मीकांत बेर्डे, ‘आजची पार्टी केदार शिंदे आणि बेला यांचं लग्न झालंय. त्यामुळे शासनाने दिलीय’, असं जोरात म्हणाले होते.”
पुढे बेला शिंदे भावूक होत म्हणाल्या, “मी जेव्हा घरी गेले तेव्हा आई होती. तेव्हा तिनं कॉलेजमधून अशी अचानक का आली आहेस, असं सगळं विचारलं आणि मी तिला फक्त येईन, असं म्हटलं. त्यानंतर घरातून निघाले. आई-बाबांना केदार फक्त ‘महाराष्ट्राची लोकधारा’च करीत आहे हे माहीत होतं. त्यात तो तेव्हा आजी-आजोबांकडे राहत होता. त्यामुळे हक्काचं घर नाही.”