Kishori Shahane Love Story : आपल्या निखळ सौंदर्याने आणि सहजसुंदर अभिनयाने गेली दोन दशके मराठीसह हिंदी प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे किशोरी शहाणे. आजवर अनेक मालिका आणि सिनेमांमधून त्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. तसंच ‘बिग बॉस मराठी’ या रिअॅलिटी शो मध्येही त्यांनी सहभाग घेतला होता.
‘बिग बॉस मराठी’ या शोमध्येच त्यांनी आरोह वेलणकरला त्यांची लव्हस्टोरी सांगितली होती. अशातच आता पुन्हा एकदा किशोरी शहाणेंनी त्यांच्या लव्हस्टोरी शेअर केली आहे. झी मराठीवरील ‘आम्ही सारे खवय्ये जोडीचा मामला’मध्ये किशोरी शहाणे आणि पती दिपक बलराज यांनी हजेरी लावली होती. यावेळी किशोरी शहाणेंनी आपली फिल्मी लव्हस्टोरी सांगितली.
या कार्यक्रमात किशोरी शहाणेंनी लव्हस्टोरी सांगताना म्हटलं, “आमच्या मैत्री आणि ओळखीला साधारण तीन-चार वर्षे झाली होती. तसंच माझं कुटुंब आणि दिपकचं कुटुंबही एकमेकांचे मित्र-मैत्रीण झाले होते. तर एकेदिवशी मला माझ्या बहिणीने विचारलं की, ‘तू दिपकशी लग्न करणार आहेस का?’ त्यावर मी तिला ‘करू शकते का?’ असं उत्तर दिलं. तेव्हा रात्रीचे ११ वाजले होते आणि बहीण म्हणाली, ‘दिपकला विचार लग्न करणार का?’ तिने असं म्हणताच मी दिपकला फोन केला आणि रात्री ११ वाजताच ‘तुम्ही माझ्याशी लग्न करणार का?’ असं विचारत प्रपोज केलं. त्यावर ते ‘काय? आपण उद्या भेटणार आहोत ना. तेव्हा याबद्दल बोलू…’ म्हणाले. त्यावर मी त्यांना ‘मी विचारतेय; कारण माझी लग्न करण्याची इच्छा आहे’ असं म्हणाले.”
किशोरी शहाणे इन्स्टाग्राम पोस्ट
दरम्यान, बॉलीवूड अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्यामुळे दिपक आणि किशोरी यांची ओळख झाली. हप्ता बंद’ या चित्रपटाचं दिग्दर्शन करत होते. यासाठी त्यांना मराठी चेहरा हवा होता. त्यामुळे जॅकी यांनी किशोरी यांचं नाव सुचवलं. त्यानंतर दिपक आणि किशोरी यांची पहिली भेट फिल्मिस्तान स्टुडीओमध्ये झाली आणि पहिल्या भेटीतच दिपक यांनी किशोरीला चित्रपटासाठी फायनल केलं.
‘हप्ता बंद’च्या निमित्ताने किशोरी आणि दिपक यांची रोजच भेट होत होती. त्यामुळे त्यांची चांगली मैत्री झाली. पुढे या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि मग त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. लग्नाचा निर्णय घेतल्यानंतर किशोरी आणि दिपक यांच्या घरच्यांनीही पाठिंबा दिला.