Lakshmikant Berde Daughter New Business : मराठी मनोरंजन विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. मात्र, अभिनयाबरोबरच व्यवसायातदेखील अनेक अभिनेत्रींनी आपलं नाव कमावलं आहे.

तेजस्विनी पंडित, अभिज्ञा भावे, प्राजक्ता माळी, रेश्मा शिंदे, मृणाल दुसानीस या आणि अशा अनेक अभिनेत्रींनी स्वतःचा नवा व्यवसाय सुरू केला आहे. नुकतंच ऋतुजा बागवेनेही स्वतःचं रेस्टॉरंट सुरू करत व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केलं. यात आता आणखी एका अभिनेत्रीची भर पडली आहे, ती म्हणजे स्वानंदी बेर्डे.

दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बर्डे यांची लेक स्वानंदी बेर्डेने व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. ही आनंदाची बातमी तिने आपल्या सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना दिली आहे. स्वानंदीने स्वतःचा ज्वेलरी ब्रँड सुरू केला आहे. आईवडिलांच्या नावावरून तिने तिच्या ज्वेलरी ब्रँडचं नाव ठेवलं आहे.

स्वानंदीच्या ज्वेलरी ब्रँडचं नाव ‘कांतप्रिया’ असं आहे. वडील लक्ष्मीकांत यांच्या नावातील ‘कांत’ आणि आई प्रिया यांच्या नावामधील ‘प्रिया’ असं एकत्र करून तिने ‘कांतप्रिया’ हे नाव ठेवलं आहे. ‘कांतप्रिया’ या ब्रँडची खास झलक तिने आपल्या सोशल मीडियावर शेअर केली आहे. यासह तिने तिच्या नव्या व्यवसायानिमित्त आनंदी भावना व्यक्त केल्या आहेत.

या पोस्टखालील कॅप्शनमध्ये स्वानंदी म्हणते, “आज मी माझ्या एका अशा स्वप्नाची पाऊलवाट चालत आहे, जे प्रेमाने, आठवणींनी आणि मनापासून जपलं गेलंय. ‘कांतप्रिया’ हे माझ्यासाठी केवळ एक ब्रँड नाही, तर माझ्या हृदयाचाच एक भाग आहे. कारण – त्याचं नाव माझ्या वडिलांच्या लक्ष्मीकांत (कांत) आणि आईच्या प्रिया (प्रिया) नावांपासून बनलं आहे. हे दोघं माझं आयुष्य आहेत.”

यापुढे ती म्हणते, “दागिन्यांच्या व्यवसायातील माझा हा प्रवास म्हणजे, माझ्या आईवडिलांचं प्रेम आणि त्यांचा वारसा जपण्यासाठी निवडलेला एक मार्ग आहे. भारतीय परंपरा आणि आधुनिकतेचं एक सुंदर मिश्रण, विशेषत: लग्न, सण-उत्सव आणि रोजच्या खास क्षणांसाठी ‘कांतप्रिया’ आहे. दागिन्यांच्या या नव्या प्रवासात मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते.”

दरम्यान, या पोस्टखाली स्वानंदीला तिच्या अनेक चाहत्यांनी या नव्या व्यवसायानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच चाहत्यांबरोबरच संस्कृती बालगुडे, मानसी नाईक, सना शिंदे, मेघा धाडे, सोहम बांदेकरसह अनेक कलाकारांनीसुद्धा तिला कमेंट्समध्ये अभिनंदन म्हटलं आहे.