Lalit Prabhakar Talks About Marriage : ललित प्रभाकर मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. आजवर त्यानं अनेक चित्रपटांत काम करीत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सध्या तो त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. अशातच यानिमित्त त्यानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याला त्याच्या लग्नाबद्दल विचारण्यात आलं होतं.
कलाकारांच्या आयुष्यात काय घडतंय, ते कोणाला डेट करतायत का? त्यांचं लग्न झालंय का किंवा का नाही झालं असे अनेक प्रश्न त्यांच्या चाहत्यांच्या मनात असतात आणि आता सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना थेट तसं विचारलंही जातं. अशातच आता ललितनं त्याच्या ‘आरपार’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त दिलेल्या मुलाखतीत त्याला लग्नाबद्दल विचारण्यात आलं होतं.
ललित प्रभाकरने सांगितलं लग्न न करण्यामागचं कारण
ललित व हृता दुर्गुळे यांनी एकत्र ‘जस्ट नील थिंग्स’ला मुलाखत दिली. त्यामध्ये हृताला तू लग्न का केलंस आणि ललिताला लग्न का नाही केलंस, असं विचारण्यात आलेलं. यावेळी ललितला तुझे लग्नाबद्दल काय विचार आहेत, असंही विचारण्यात आलं होतं. त्यावर तो म्हणाला, “मेरी दुल्हन तो आझादी ही. मला असं वाटतं की, ही खूप जबाबदारीची गोष्ट आहे आणि मी नाहीये त्यासाठी तयार. कारण- आता माझं ध्येय वेगळं आहे. माझं काम आणि या सगळ्या खूप गोष्टी सुरू आहेत आणि हे सगळं करताना मला मजापण येतेय.”
ललित पुढे म्हणाला, “मला असं वाटतं की, मी लग्नासाठी पूर्णपणे तयार नाहीये आणि असं असताना मला लग्न करून माझ्यावर आणि इतर कोणावरही अन्याय करायचा नाहीये.” ललितनंतर हृतानंही तिला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं. त्याबद्दल हृता म्हणाली, “मला या गोष्टीची स्पष्टता होती की, मला लग्न करायचं आहे. मला सेटल व्हायचं होतं. तुम्हाला अशी स्पष्टता नसेल, तर नका करू लग्न. कारण- ही खूप मोठी जबाबदारी आहे. प्रेम वगैरे सगळं ठीक आहे, ते लग्नानंआधीही होतं. पण लग्नानंतर दररोज नवीन आवाहन असतं. मात्र, माझा अनुभव खूप चांगला आहे.”
दरम्यान, १२ सप्टेंबरला हृता व ललित यांचा ‘आरपार’ हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. महत्त्वाचं म्हणजे दोघांचाही त्या दिवशी वाढदिवस आहे आणि पहिल्यांदाच हे दोघे या चित्रपटातून एकत्र काम करीत आहेत.