मराठी मनोरंजन सृष्टीमधील एक अष्टपैलू अभिनेते म्हणजे ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर. मराठीबरोबरच त्यांनी अनेक हिंदी सिनेमांमध्येसुद्धा आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. केवळ मालिकांमधूनच नव्हे तर रंगभूमी आणि चित्रपटांमधून त्यांनी अनेक उत्तमोत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.

गेली अनेक दशकं दिलीप प्रभावळकर हे आपल्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. अभिनयाचा दांडगा अनुभव असलेल्या दिलीप प्रभावळकरांबरोबर काम करणाऱ्या प्रत्येकानेच त्यांचं भरभरून कौतुक केलं आहे.

अशातच मराठी अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरनेही त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला. यावेळी तीने दिलीप प्रभावळकरांच्या स्वभावाचं आणि अभिनयाचं कौतुक केलं.

दिलीप प्रभावळकर अभिनयाचे जणू विद्यापीठच : प्रियदर्शिनी इंदलकर

लोकशाही फ्रेंडलीला दिलेल्या मुलाखतीत प्रियदर्शिनी म्हणाली, “दिलीप सरांबरोबर काम करण्याचा अनुभव खूपच कमाल होता. ते अभिनयाचे आणि अनेक गोष्टींचं जणू एक विद्यापीठच आहेत. आपलं काम, सेटवरील त्यांचा वावर, पात्राचा परकाया प्रवेश… या सगळ्या गोष्टींत ते कमाल आहेत. त्यांच्याबरोबर मी नुकतंच ‘दशावतार’ सिनेमात काम केलं. संहितेमधील लिहिलेली वाक्य ते ज्या पद्धतीने सादर करायचे, त्यामुळे मला अभिनय करण्याची काही गरजच पडली नाही.”

दिलीप प्रभावळकर हे प्रेक्षकांना नव्याने भेटतील : प्रियदर्शिनी इंदलकर

यानंतर प्रियदर्शिनी सांगते, “मला फक्त त्यांच्या अभिनयाला प्रतिसाद द्यायचा होता. त्यांनी माझं काम खूप सोपं केलं. ‘दशावतार’ सिनेमात ते ज्यापद्धतीने वावरले आहेत, त्यावरून मला वाटतं दिलीप प्रभावळकर हे प्रेक्षकांना नव्याने भेटतील. या सिनेमात माझ्या वाटेला त्यांच्याबरोबरचे अनेक सीन्स आहेत.”

दिलीप सरांबरोबर काम करायला मिळणं माझं भाग्य : प्रियदर्शिनी इंदलकर

पुढे प्रियदर्शिनी म्हणाली, “फुलराणीमध्ये विवेक गोखले यांच्याबरोबर मला डान्स करण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर आता पुन्हा इतक्या मोठ्या व्यक्तीबरोबर काम करायला मिळण्याची माझी दुसरी संधी आहे. याबद्दल मी स्वत:ला भाग्यवानच समजते.”

दिलीप प्रभावळकरांचा ‘दशावतार’ येत्या १२ सप्टेंबर रोजी होणार प्रदर्शित

दरम्यान, दिलीप प्रभावळकरांच्या ‘दशावतार’ची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या ट्रेलरला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. येत्या १२ सप्टेंबर रोजी हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.