Marathi Actor’s Post on Politics : मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार हे मनोरंजन या क्षेत्रात सक्रीय असण्याबरोबरच आजूबाजूच्या सामाजिक परिस्थितीवरही त्यांची मतं व्यक्त करताना दिसतात. सामाजिक आणि राजकीय विषयांबद्दल ते विविध पोस्ट शेअर करत आपल्या चाहत्यांमध्ये जागरूकता निर्माण करत असतात. यापैकीच एक अभिनेता म्हणजे आस्ताद काळे.
मराठी नाटक, मालिका आणि सिनेमांमधुन प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा आस्ताद सोशल मीडियावरही तितकाच सक्रीय असतो. सोशल मीडियावर तो आपल्या कामाबद्दलची माहिती शेअर करत असतो. तसंच तो अनेकदा त्याची राजकीय आणि सामाजिक मतं व्यक्त करताना दिसतो. गेल्या काही दिवसांपासून तो घोडबंदर रोडवरील रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल पोस्ट शेअर करताना दिसतो.
या पोस्टमधून आस्ताद संबंधित मंत्र्यांना थेट सवालही विचारताना दिसतो. अशातच त्याने एक नवीन पोस्ट शेअर केली आहे, ज्यात त्याने राजकीय व्यक्तींच्या शिक्षण अआणि निर्वृत्तीबद्दल मत व्यक्त केलं आहे. आयटी, कॉर्पोरेट आणि बँकिंगसह इतर नोकरदारांच्या क्षेत्राचं उदाहरण देत त्याने राजकीय क्षेत्रातली विसंगती सांगितली आहे.
या पोस्टमध्ये आस्ताद असं म्हणतो, “कॉर्पोरेट असो, आय.टी. असो, बँकिंग असो…. या सर्व क्षेत्रांमधे महिन्याला साधारण २,५०,०००/- ते ४,५०,०००/- रुपये पगार मिळवणारे लोक मोठ्या पदांवर असतात, अधिकारी असतात. त्यांना तिथपर्यंत पोहोचायला बऱ्यापैकी उच्च शिक्षण घेणं आवश्यक असतं. त्यांनी काही महिने कामात टाळाटाळ केली, जबाबदाऱ्या पार पाडल्या नाहीत; तर त्यांची नोकरी अथवा त्यांचं पद धोक्यात येऊ शकतं.”
यानंतर तो म्हणतो, “शिवाय सरकारी बँकेतले, कंपनीतले कर्मचारी/अधिकारी असाल तर ठराविक वयाचे झाल्यावर तुम्हाला निवृत्त व्हावंच लागतं. मात्र, राजकारण हे एकमेव क्षेत्र असं आहे, जिथे शिक्षणाची मूलभूत काहीही अट नाही. लोकनियुक्त प्रतिनिधी म्हणून निवडून आलात की, पुढची ५ वर्ष तुमचा हा पगार-भत्ते वगैरे चालू असतं. दुसऱ्यांदा निवडून आलात की, त्यात वाढही होते.”
यापुढे तो म्हणतो, “या ५ वर्षांमधे तुम्ही धड काम नाही केलंत, जबाबदाऱ्या पार नाही पाडल्यात, तरी तुमची हकालपट्टी होत नाही आणि ही कामं, जबाबदाऱ्या गावं, शहरं, राज्यं आणि देश चालवण्याशी निगडित आहे राव! आणि वयोमानपरत्वे निवृत्तीची सक्तीही नाही. मज्जाच मज्जा आहे बुवा सगळी!”
आस्ताद काळे पोस्ट
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच आस्तादने प्रताप सरनाईक यांनी घेतलेल्या टेस्ला कारबद्दलची खोचक पोस्ट शेअर केली होती. याबद्दल आस्तादने ‘त्या नातवासाठी घेतलेल्या नवीन टेस्ला रूपी खेळण्याची किंमत किती आहे हो काका? एवढा पैसा कुठून आला काका?’ असे प्रश्न विचारले होते. तसंच या पोस्टमध्ये त्याने “तुमच्या लाडक्या नातवाला लाल दिव्यांचा ताफा बरोबर न घेता ते खेळणं घोडबंदर रस्त्यावरून न्यायला सांगा ना” असंही म्हटलं होतं.