Abhinay Deo Talk About AI Impact In Entertainment Industry : आर्टिफिशियल इंटिलिजन्स म्हणजेच AI या नव्या तंत्रज्ञानाचा आता जवळपास सर्वच क्षेत्रात शिरकाव झाला आहे. सर्वच क्षेत्रात ‘AI’च्या मदतीने अगदी काही मिनिटांत कामे केली जात आहेत. आपल्या नेहमीच्या वापरातही हा ‘AI’ आला आहे. हे तंत्रज्ञान हळूहळू लोकांना त्यांची विविध कामं पूर्ण करण्यास मदत करत आहे. या तंत्रज्ञानाचा जसा फायदा होतोय, तसंच येणाऱ्या काळात यामुळे निर्माण होणारे धोकेही व्यक्त केले जात आहेत.
आयटी क्षेत्र असो वा मनोरंजन क्षेत्र असो. AI च्या मदतीनं सगळी कामं सोपी झाली आहेत. AI चा वापर आता सिनेमाच्या निर्मितीमध्येसुद्धा होतो आहे आणि त्यामुळेच येत्या दीड वर्षात सिनेमा बंद होणार असल्याचं मत दिग्दर्शक, निर्माते व अभिनेते महेश मांजरेकर यांनी व्यक्त केलं होतं. याचबद्दल आता अभिनेते अभिनय देव यांनीही त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
अमोल परचुरे यांच्या कॅचअपला दिलेल्या मुलाखतीत अभिनय देव म्हणाले, “आज AI ने सगळं जग व्यापून टाकलं आहे. सर्व क्षेत्रांत प्रवेश केला आहे. अनेकांच्या नोकऱ्याही AI मुळे जात आहेत, हे आपण वाचतच आहोत. दीड-दोन वर्षात सिनेमा बंद होईल, असंही कोणीतरी बोललं. पण, मला वाटतं हे कधीच होणार नाही. AI अशी आपली किती जागा घेईल यालाही एक मर्यादा आहे. ही मर्यादा पार व्हायला कदाचित ५०-६० वर्ष जातील, तोवर आपणही प्रगत झालेलो असू.”
“दुसऱ्यांच्या मार्गात अडथळा आणून…”
यापुढे ते इंडस्ट्रीबद्दल त्याचं मत व्यक्त करीत म्हणाले, “आपला एकच प्रॉब्लेम आहे, आपण एक नाही आहोत. जरी भाषा एकच असली तरी प्रत्येकामध्ये स्पर्धेचं वातावरण आहे. स्पर्धा असावी, पण दुसऱ्यांच्या मार्गात अडथळा आणून स्वतः पुढे जायचा प्रयत्न करणं चुकीचं आहे. एकमेकांना धरून जर एकत्र पुढे गेलात तर अख्खी इंडस्ट्रीही पुढे जाईल. आपण आधीच इतके छोटे आहोत, कारण आपल्याला हिंदी आणि इतर भाषिक लोकांशी स्पर्धा करायची आहे. आपल्याला आधीच क्रश केलं आहे, त्यामुळे जर कंपू (गट) बनवले तर आपण पुढे कसे जाणार?”
AI बद्दल महेश मांजरेकरांनी केलेलं वक्तव्य
दरम्यान, महेश मांजरेकरांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत AI बद्दल त्यांचं मत व्यक्त केलं होतं. “मी सहा महिन्यांपूर्वी पाहिलेला AI आणि आताचं AI यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. ज्या दिवशी त्यांच्या हाती सिनेमा बनवण्याचा कोड लागेल, त्या दिवशी आपण संपणार; त्यामुळे अनेक लोक AI वर सिनेमे बनवणार, पण ते बघणार कोण? त्यामुळे येत्या दीड वर्षात सिनेमे बंद होणार, हे खूपच धोकादायक आहे”, असं महेश मांजरेकर म्हणाले होते.
