मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय दिग्दर्शक म्हणून हेमंत ढोमेला ओळखले जाते. तो कायमच विविध धाटणीचे चित्रपट प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो. काही महिन्यांपूर्वी त्याचा ‘झिम्मा’ हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसमध्येही चांगले कलेक्शन केले होते. नुकतंच हेमंत ढोमेने दिग्दर्शक परेश मोकाशी यांच्या ‘वाळवी’ चित्रपटाबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.

हेमंत ढोमे हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच हेमंत ढोमेने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने वाळवी चित्रपटाचे एक पोस्टर शेअर केले आहे. त्यात त्याने त्याला हा चित्रपट कसा वाटला? त्याबद्दल सांगितले आहे.
आणखी वाचा : वाळवी चित्रपट कसा वाटला? प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला “मी कितीही वेळा…”

हेमंत ढोमेची पोस्ट

“एक असतो मराठी सिनेमा आणि दुसरा असतो वाळवी! म्हणजे अतिशय सकस आणि चांगला सिनेमा!

मराठीत वेगळे प्रयोग होत नाहीत, सकस पटकथा नसतात… कलाकारांची तद्दन विनोदी तिच तिच कामं असतात… शुटींगचा दर्जा फारच सुमार असतो, साऊंड वगैरे तर बोलायलाच नको नाही का?

प्रेक्षकांच्या या आणि अशा अनेक प्रश्नांना कडक दर्जाचं उत्तर म्हणजे आमचा सिनेमा ‘वाळवी’
मी टिमचा भाग नसुनही आमचा म्हणतोय कारण आम्हा सगळ्या कलाकारांना अभिमान वाटावा असा झालाय हा सिनेमा!
असे सिनेमे जमून यायला लागते ती एक दर्जेदार टीम! एका कोणाचं नाव घेणं म्हणजे बाकी टिमवर अन्याय आहे…
वाळवीतल्या वाळवीने सुद्धा आपलं काम ठोकलंय एवढंच म्हणेन!

मा काही समिक्षक नव्हे, मी मराठी सिनेमाचा चोखंदळ प्रेक्षक म्हणून तुम्हाला हक्काने सांगतोय!
वा ळ वी… ब घा च!!!
वाळवी तुमचं मनोरंजन करणारच! तुम्हाला मजा येणारच!
लवकरच हाऊसफुल्लचे बोर्डस् झळकतील आणि मराठी सिनेमा पुन्हा एकदा अभिमानास्पद केल्या बद्दल माझ्या या लाडक्या टिमचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा!
चला मंडळी तिकीटं बुक करा!”, असे हेमंत ढोमेने म्हटले आहे.

आणखी वाचा : Vaalvi Movie review : मराठी प्रेक्षकांचं डोकं पोखरणारा स्वप्नील-सुबोधचा ‘वाळवी’ पाहायलाच हवा, कारण…

दरम्यान झी स्टुडिओज आणि मधुगंधा कुलकर्णी यांनी ‘वाळवी’ची निर्मिती केली आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा आणि सवांद परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी यांचे आहेत. यात स्वप्नील जोशी, सुबोध भावे, अनिता दाते, शिवानी सुर्वे हे कलाकार झळकणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर चांगलाच हिट ठरताना दिसत आहे. यात हे कलाकार एका वेगळ्याच अंदाजात दिसत असून त्यांच्या व्यक्तिरेखा चित्रपटाबद्दलची उत्कंठा अधिकच वाढवणाऱ्या आहेत. ‘वाळवी’ हा मराठीतील पहिला थ्रिलकॅाम चित्रपट आहे.