एक दिग्गज मराठी अभिनेते आहेत, जे मानसोपचारतज्ज्ञही आहेत. करिअरच्या सुरुवातीला त्यांनी मानसोपचारतज्ज्ञ म्हणून काम केलं, पण अभिनयाची आवड असल्याने ते या क्षेत्रात आले. इथेही आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. नाटकांबरोबरच मराठीसह हिंदी सिनेमांमध्येही त्यांनी काम केलं आणि आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.
आम्ही ज्यांच्याबद्दल बोलतोय त्यांचं नाव मोहन आगाशे. ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांचा जन्म २३ जुलै १९४७ रोजी झाला होता. ते सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार होते. त्यांनी पुण्यात त्यांचे शिक्षण पूर्ण केले. इथे त्यांनी बी.जे. मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसची डिग्री घेतली. त्या काळी एमबीबीएस होणं ही खूप मोठी गोष्ट होती. नंतर मोहन आगाशे यांनी मानसोपचारात पदव्युत्तर पदवी घेतली. पदव्युत्तर शिक्षण घेताना त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाली.
मोहन आगाशे यांनी मानसोपचारतज्ज्ञ म्हणून काम सुरू केलं. त्याचबरोबर ते अभिनयही करू लागले. त्यांनी मराठी, हिंदीसह इतर भाषांमधील चित्रपटांमध्येही काम केले आहे. या सर्व भाषांमधील चित्रपटांमध्ये त्यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. ‘अग्निहोत्र’, ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’, ‘गुंतता हृदय हे’ या मालिकांमध्ये मोहन आगाशे यांनी काम केलं होतं.
मोहन आगाशे यांनी स्मिता पाटीलबरोबर केलंय काम
स्मिता पाटील व मोहन आगाशे यांनी ‘जैत रे जैत’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या चित्रपटातील दोघांचाही अभिनय प्रेक्षकांना खूप भावला होता. या मराठी चित्रपटाचं प्रचंड कौतुक झालं होतं. १९७७ साली आलेल्या ‘जैत रे जैत’चे दिग्दर्शन जब्बार पटेल यांनी केले होते. हा चित्रपट स्मिता व मोहन या दोघांच्याही करिअरमधील महत्त्वाचा चित्रपट आहे.
‘जैत रे जैत’मध्ये स्मिता पाटील यांनी चिंधी नावाच्या महिलेची भूमिका साकारली होती, जी तिच्या पतीला सोडते. तर मोहन आगाशे यांनी नाग्या नावाच्या मध गोळा करणाऱ्या व्यक्तीची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील दोघांचीही केमिस्ट्री लोकांना आवडली होती.
१९९३ साली महाराष्ट्रातील लातूरमध्ये भूकंप झाला होता, तेव्हा खूपच नुकसान झाले होते. तेव्हा ‘इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च’ने मोहन आगाशे यांना भूकंपग्रस्तांच्या मानसिक परिणामांचे संशोधन करण्याचे काम सोपवले होते. मोहन आगाशे यांनी पुण्यातील बी.जे. मेडिकल कॉलेज आणि ससून हॉस्पिटलमध्ये काम केले आहे.
मानसोपचारतज्ज्ञ आणि अभिनेते, डॉ. आगाशे यांना नाट्य क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी १९९६ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि १९९० मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.