अभिनेता संदीप पाठक फक्त अभिनेता म्हणूनच नव्हे तर एक व्यक्ती म्हणूनही उत्तम आहे. सामान्य लोकांशी संवाद साधणं असो वा चाहत्यांशी आदराने बोलणं असो यामधून संदीपची माणूसकी दिसून येते. इतकंच नव्हे तर इतर सामान्य व्यक्तींप्रमाणेच तो स्वतःला मानतो. त्याचा नुकताच व्हायरल झालेला एक व्हिडीओ याचंच एक उत्तम उदाहरण आहे. पुणे ते मुंबई प्रवासादरम्यानचा व्हिडीओ संदीपने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. त्याचा हा व्हिडीओ पाहून नेटकरीही याचं कौतुक करत आहेत.
संदीप आपल्या कामामुळे चर्चेत तर असतोच. पण त्याचबरोबरीने ज्या चाहत्यांनी आपल्याला मोठं केलं त्यांच्याशी थेट संवाद साधणं त्याला आवडतं. म्हणूनच की काय पुणे ते मुंबई प्रवास करत असताना रस्त्यालगत कणीस भाजताना दोन महिला त्याला दिसल्या. या महिलांचं ते छोटसं दुकान पाहून तो गाडीमधून उतरला आणि तिथे स्वतःच काम करू लागला.
पाहा व्हिडीओ
संदीप त्याच्या कुटुंबासह लोणावळा येथे गेला होता. यावेळी त्याला भाजलेलं कणीस खाण्याचा मोह आवरला नाही. म्हणून त्याने स्वतःच दुकानामध्ये जाऊन कणीस भाजलं तसेच आपल्या कुटुंबियांनीही दिलं. व्हिडीओ शेअर करताना संदीप म्हणाला, “पुण्याहून मुंबईकडे येताना खंडाळ्याजवळ पावसात मस्त गरम गरम मक्याचं कणीस खायची इच्छा झाली आणि थांबलो. सुरेखा ताई आणि सुनीता ताईंनी अगदी आपलेपणाने विचारपूस केली.”
“मी म्हटलं थांबा मीच भाजतो कणीस आणि मी भाजलेलं कणीस तुम्ही खायचं आहे, माझ्या बायकोला, दोन लेकरांना मी भाजलेलं कणीस खायला देतो. कुटुंबही खूश. छोट्या छोट्या गोष्टीमधेच जीवनाचा खरा आनंद दडलेला आहे.” तसेच लोणावळ्या असलेल्या या दुकानाला आवश्य भेट द्या असंही संदीप यावेळी म्हणाला. संदीपचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी त्याचं कौतुक केलं आहे.