Umesh Kamat Did Shooting With Real Dead Body : आपल्या कलेतील जिवंतपणाचा अनुभव प्रेक्षकांना घेता यावा म्हणून अनेक कलाकार खूप मेहनत घेताना दिसतात. पडद्यावर साकारत असलेली एखादी भूमिका प्रेक्षकांना खरी वाटावी म्हणून कलाकार त्यांच्या परीने जे शक्य होईल ते करतात. मग यासाठी कलाकार काहीही करायला तयार होतात. कोणी भूमिकेसाठी वजन वाढवतं तर कोणी कमी करतं; तर अ‍ॅक्शनसाठीही काही कलाकार विशेष मेहनत घेताना दिसतात.

अशातच एका मराठी अभिनेत्याने शूटिंगसाठी मृतदेहाबरोबर शूटिंग केल्याचा अनुभव सांगितला आहे. हा अभिनेता म्हणजे उमेश कामत. नाटक, मालिका आणि सिनेमांमधून उमेशनं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. अशातच आता त्याचा ‘ताठ कणा’ नावाचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘ताठ कणा’मधून जगप्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ. प्रेमानंद रामाणी यांची गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

या ‘ताठ कणा’ सिनेमात उमेश कामतने डॉ. प्रेमानंद रामाणी यांची भूमिका साकारली आहे. डॉ. प्रेमानंद यांची भूमिका साकारत असल्यानं उमेशने खऱ्याखुऱ्या मृतदेहाबरोबर एक सीन शूट केला. नुकत्याच एका मुलाखतीत उमेशनं मृतदेहाबरोबरच्या शूटिंगचा भयावह अनुभव शेअर केला.

लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत उमेशने सांगितलं की, “गिरीश मोहिते (दिग्दर्शक) सर म्हणाले की ‘आपल्याला परवानगी मिळालीये, आधी मिळत नव्हती; त्यामुळे आपण तो सीन करणार नव्हतो. पण, आता आपल्याला परवानगी मिळालेली आहे, त्यामुळे आपण तो सीन शूट करतोय. माझ्या डोक्यात सीन तयार आहे. खराखुरा मृतदेह आहे आणि तू तिथे जाऊन फक्त मी सांगतो तेवढं कर. आपल्याला तो शॉट मिळाला तर खूप चांगलं होईल.’ त्यांनी हे सांगितल्यानंतर माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. हा सीन मी कसा करणार आहे? असा विचार माझ्या मनात आला.”

यानंतर उमेश म्हणाला, “आम्ही त्या भागात जेव्हा गेलो, तेव्हा मला तो एक विशिष्ट प्रकारचा वास यायला लागला आणि मी म्हटलं बापरे, काही खरं नाही. ती डेड बॉडी कशी दिसते हेही माहीत नव्हतं. त्यात आजूबाजूचे जे लोक रिअ‍ॅक्ट करत होते त्यावरून मला जास्त भीती वाटत होती. त्या रूममध्ये बाकी कोणीच येणार नव्हतं, मला एकट्याला जायचं होतं.”

उमेश कामत इन्स्टाग्राम पोस्ट

यापुढे तो म्हणाला, “नंतर गिरीश सरांनी सांगितलं ‘तू आतमध्ये असशील आणि कॅमेरा बाहेर आहे. मी अ‍ॅक्शन म्हटल्यावर अ‍ॅक्शन कर. ते झालं की मी कट म्हणेन, मग तू लगेच बाहेर निघून ये.’ मला वाटलेलं मी काही हे करू शकणार नाही, पण शेवटी धीर एकवटला. आपण कोणाची भूमिका करतोय हे लक्षात आणलं. मी घाबरत घाबरत तिथे जाऊन अभिनय केला तर मग सिनेमाला काहीच अर्थ नाही.”

दरम्यान, उमेश कामतच्या ‘ताठ कणा’ या चित्रपटाचं दिग्दर्शन गिरीश मोहिते यांनी केलं आहे; तर चित्रपटात उमेशसह दीप्ती देवी, सायली संजीव, सुयोग गो-हे, अजित भुरे, शैलेश दातार, अनुपमा ताकमोगे, रवी गोसाई अशा काही कलाकारांच्या भूमिका आहेत. येत्या २८ नोव्हेंबर रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.