Vaibhav Managle Post On Patholes : मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे हा अनेक वर्षांपासूनचा चर्चेतला मुद्दा आहे. प्रदीर्घ काळापासून या खड्ड्यांकडे प्रशासन कानाडोळा करीत असल्याच्या तक्रारी कोकणवासीय करीत आहेत. अशातच गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. या गणेशोत्सवासाठी अनेक चाकरमान्यांनी गावची वाट धरली आहे. मुंबईतून अनेक कोकणवासीय आपापल्या गावी कोकणात गणपतीसाठी जात आहेत.

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी काही जण ट्रेननं प्रवास करीत आहेत; तर काही रस्त्यानं… पण रस्त्यानं प्रवास करताना अनेकांना खड्ड्यांच्या अडथळ्यांतून आपली वाट काढावी लागतेय. मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांबाबत आजवर अनेकांनी त्यांच्या संताप आणि नाराजीच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अशातच आता मराठी अभिनेत्यानंसुद्धा या खड्ड्यांबद्दलची पोस्ट शेअर केली आहे.

मराठी अभिनेते वैभव मांगले यांनी कोकणात जाणाऱ्या रस्त्यावरील खड्ड्यांबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. तसेच या पोस्टमधून त्यांनी कोकणात येणाऱ्या कोकणवासीयांना सुरक्षित प्रवास करण्याचं आवाहनही केलं आहे. या पोस्टमध्ये ते असं म्हणतात, “गेली १७ वर्षं आपण रस्ता चांगला होण्याची जी वाट पाहतोय; तो आता होण्याच्या मार्गावर आहे… मी आजच देवरुखला आलो. माणगांवच्या आसपासचा, चिपळूण, संगमेश्वर येथील रस्ता अजून होणे बाकी आहे.”

त्यानंतर ते म्हणतात, “माणगाव, संगमेश्वर येथे तर भीषण अवस्था आहे; तो रस्ता कधी होईल किंवा होईल की नाही हेही सांगता येत नाही. आजूबाजूला घनदाट वस्ती आहे, त्यातून ते कसा मार्ग काढणार आहेत कुणास ठाऊक… पण बाकी रस्ता झाला आहे आणि तो चांगला आहे. सावकाश या. घाई करू नका. विरुद्ध दिशेने गाड्या चालवू नका. चुकीच्या पद्धतीनं गाडी ओव्हरटेक करू नका, त्यानं वाहतूक अजून अवघड होते. शुभ यात्रा.”

वैभव मांगले यांची इन्स्टाग्राम स्टोरी
वैभव मांगले यांची इन्स्टाग्राम स्टोरी

दरम्यान, वैभव मांगले हे सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. सोशल मीडियाद्वारे ते त्यांच्या चित्रांचे फोटो शेअर करित असतात. तसेच अनेकदा त्यांचेही फोटो-व्हिडीओ शेअर करताना दिसतात. त्याशिवाय अभिनेते सामाजिक आणि राजकीय परिस्थितींवरही त्यांची मतं व्यक्त करताना दिसतात. अशातच त्यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेबद्दलची पोस्ट शेअर केली आहे.