Marathi Actor On Kedar Shinde : काही दिवसांपुर्वी केदार शिंदे यांनी ‘झापुक झुपूक’च्या अपयशाबद्दल त्यांची प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी “कदाचित माझ्यात, माझ्या विचारांत काहीतरी खोट असेल, त्यामुळे सिनेमा लोकांनी पाहिलाच नाही. त्यांना तो (सूरज चव्हाण) अभिनेता बघायचाच नसेल. त्यामुळे त्यांनी ती गोष्ट नाकारली” असं म्हटलं होतं. आता त्यांच्या या प्रतिक्रियेवर एका मराठी अभिनेत्याने व्हिडीओ शेअर केला आहे.

दिवंगत अभिनेते विजय चव्हाण यांचा मुलगा वरद चव्हाणने युट्यूबवर व्हिडीओ शेअर करत केदार शिंदेंच्या ‘झापुक झुपूक’च्या अपयशाबद्दलच्या प्रतिक्रियेवर त्याचं मत व्यक्त केलं आहे. या व्हिडीओमध्ये वरद असं म्हणतो, “मी नुकतीच केदार शिंदे ‘झापुक झुपूक’बद्दल बोलल्याची व्हिडीओ क्लिप बघितली. त्यांचा पूर्ण पॉडकास्ट मी पाहिलेला नाही. फक्त ती क्लिपच पाहिली आहे. ‘झापुक झुपूक’चं अपयश पचवलंत कसं? या प्रश्नावर त्यांचं पहिलं वाक्य असं होतं की, ‘माझ्या मनातच काहीतरी खोट असावी’. पण त्यांचं ते वाक्य मला पचलं नाही. अहो सर… तुम्ही इंडस्ट्रीमध्ये इतकी वर्षे आहात आणि तुम्ही यश-अपयश सगळंच पाहिलं आहे. अपयश तुम्ही पहिल्यांदाच बघत आहात, असा भाग नाही.”

यानंतर वरद म्हणतो, “‘झापुक झुपूक’च्या पहिल्या मोशन पोस्टर, व्हिडीओ आणि ट्रेलरपासूनच प्रेक्षकांनी या सिनेमाला रिजेक्ट केलं होतं. सिनेमापेक्षा हिरो म्हणून सूरजला रिजेक्ट केलं होतं. कदाचित असं तुमच्याबरोबर पहिल्यांदा घडलेलं असू शकतं. त्यामुळे ते तुम्हाला पचत नसेल; याआधी तुम्ही फ्लॉप्स पहिले नाहीत असा काही भाग नाही; पण तुम्ही ते अजूनही स्वीकारत नाहीत, हे कुठे तरी खटकत आहे. असं अपयश तुम्हाला पचवता येत नसेल; तर इथे तुम्हाला जे आदर्श म्हणून बघतात, त्यांनी काय करायचं?”

‘झापुक झुपूक’ सिनेमा प्रदर्शित व्हायच्या आधीच लोकांनी रिजेक्ट केला होता : वरद चव्हाण

यानंतर वरदने असं म्हटलं, “हा सिनेमा प्रदर्शित व्हायच्या आधीच लोकांनी रिजेक्ट केला होता. बऱ्याच युट्यूबर्सनी केदार शिंदेंनी स्वत:चा पैसा वापरुन सूरजला हिरो बनवत हा सिनेमा केला असता का? असं म्हटलं होतं. खरंतर अशी वैयक्तिक टिप्पणी करण्याची गरज नव्हती. पण जेव्हा प्रेक्षक सांगतात की, आम्हाला हा हिरो म्हणून मान्य नाही, तर ते स्वीकारा.”

यानंतर वरदने एक खुलासा करत असं म्हटलंय, “मुळात प्रेक्षकांपर्यंत एक गोष्ट पोहोचलेलीच नाही. ‘बिग बॉस’मधील सूरजच्या एन्ट्रीनंतर केदार शिंदेंच्या आत्या किंवा मावशीने सूरजला ‘बिग बॉस’मध्ये का घेतलं? याबद्दलची फेसबुक पोस्ट शेअर केली होती. यावर केदार शिंदेंनी त्यांना सूरज माझ्या पुढच्या सिनेमाचा हिरो असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे ‘बिग बॉस’मध्ये सूरजची एन्ट्री होणं आणि तेव्हा केदार शिंदे कलर्स मराठीचे हेड असणं… यातून मला काय म्हणायचं ते समजून घ्या. माझ्या एका व्हिडीओमध्येही मी म्हटलं होतं की, सूरजचा प्रवास खूप कौतुकास्पद आहे. भल्याभल्या लोकांना आणि स्टारकिड्स म्हणजे स्वत: मलासुद्धा जे जमलं नाही ते काम त्याने केलं.”

यापुढे वरद सांगतो, “केदार शिंदेंनी इन्स्टाग्राम लाईव्हद्वारे ट्रोलर्सना अजिबात भाव देत नसल्याचं म्हटलं होतं. पण त्या व्हिडीओमध्ये पुढे ते पाऊणतास ट्रोलर्सबद्दलच बोलत होते. यात त्यांचा बालिशपणा म्हणजे सूरज इन्स्टाग्राम लाईव्हवर होता आणि त्याला लिहिता-वाचता येत नाही असं म्हटलं आणि केदार शिंदेंनीच त्याला काळा आहेस, डुक्कर आहेस अशा अनेक कमेंट्स वाचून दाखवल्या होत्या. तुम्ही ते इन्स्टाग्राम लाईव्ह समजूतदारपणे हँडल करायला हवं होतं किंवा करायलाच नको होतं.”

यापुढे वरदने सांगितलं, “तुम्ही किंवा सूरजची पीआर टीम होती, जी सूरजची त्याच्या पहिल्याच सिनेमात दादा कोंडकेंबरोबर तुलना करत होते. त्यांना इतकं कळू नये की, जे तुम्ही लाईव्हमध्ये म्हणत होता की, आम्हाला सूरज चव्हाणचे फॅन येतील असं वाटलं होतं. ते आता गप्प आहेत. त्यांच्यासाठी आम्ही ९९ रुपयांमध्ये सिनेमा दाखवणार आहोत. आता ९९ रुपयांमध्ये सिनेमा दाखवला तरी सूरजच्या खऱ्या चाहत्यांना याचा काही फायदाच नाही. कारण मी म्हटलं होतं की, त्याची एन्ट्री होताच तो सिनेमाचा हिरो असल्याचं ठरलं होतं. मग त्याचे चाहते असो किंवा नसो, त्याने काही फरक पडत नव्हता.”

प्रेक्षकांना पाहिजे तसा कंटेट आपण देत नाहीये, हे मेकर्स म्हणून स्वीकारणं गरजेचं : वरद चव्हाण

यापुढे वरद म्हणाला, “मला मराठीचे निर्माते, दिग्दर्शक आणि मेकर्सची भिकार मानसिकता कळली नाही. त्यांचं हे म्हणणं असतं की, मराठी माणूस सिनेमा बघायला चाचपडतो; कारण एका सिनेमासाठी तो हजार रुपये का देईल? खरंतर आपले सिनेमे त्या क्षमतेचे नसतात. कारण हाच मराठी माणूस दोन हजार रुपये खर्च करून कुटुंबासह अनेक दाक्षिणात्य आणि हिंदी सिनेमे बघतो. ते जाउद्या… अनेक प्रेक्षक मराठी नाटकं बघतात, ज्याची तिकीटं तीनशे-पाचशे रुपयांचे असतात. कुठे तरी आपल्या मेकर्सने ही स्वीकारणं गरजेचं आहे की, आपण प्रेक्षकांना तसा कंटेट देत नाहीये. त्यामुळे प्रेक्षकांवर खापर फोडणं बंद करा.”

यापुढे वरद असं म्हणाला, “इन्स्टाग्राम लाईव्हमध्ये केदार शिंदेंनी म्हटलं होतं की, अनेक युट्यूबर्सना त्यांनी शॉर्ट-लिस्ट केलं आहे आणि आगामी सिनेमात ते सगळ्या युट्यूबर्सना उन्हात उभं करून एक सिनेमा बनवायला किती कष्ट लागतात हे दाखवणार आहेत. माझं म्हणणं आहे की, सर हे काय चाललंय? थोडे मोठे व्हा. कारण कोणताही माणूस पैसे खर्च करतोय, तर त्याच्याकडे तुमच्या सिनेमाला डोक्यावर घेण्याचा किंवा नाव ठेवण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि मेकर्स म्हणून तुम्हाला ते स्वीकार करणं गरजेचंच आहे. तुम्ही प्रेक्षकांना रसिक मायबाप म्हणता.”

पुढे वरद असं सांगतो, “आता तुमचं ‘सही रे सही’ हे नाटक जेव्हा आलं तेव्हापासूनच ते हाऊसफुल्ल आहे. त्या नाटकाचं ते नशीब होतं. तसं नशीब ‘झापुक झुपूक’चं नव्हतं. आता ते स्वीकारा आणि विषय सोडून द्या. त्यावर उगाच स्पष्टीकरण देत बसू नका. कारण तुम्ही आता स्पष्टीकरण देत बसलात, तर आताच्या सोशल मीडियावरील लालगंधर्वच्या टीममध्ये याल आणि त्यात तुम्हाला बघण्याची आमची इच्छा नाही. कारण तुम्ही जे बोलत आहात, त्यात मीपणा येतो आणि त्यातून तुम्ही प्रेक्षकांवर खापर फोडत आहात. तुमच्याबद्दल खूप आदर आहे. तुम्ही आतापर्यंत सातत्याने खूप चांगलं काम करत आला आहात. पण तुमच्या या एका अपयशामुळे आधीच्या कामावर पाणी सोडू नका. बालिशपणा करू नका. हा विषय संपवा आणि तुम्हाला पॉडकास्ट करायचा असेल; तर चुकलं बोलून थांबवा असं मला वाटतं. तुमचा एक चाहता म्हणून मी हे सांगत आहे. बाकी तुम्ही तितके सुज्ञ आहातच. सध्याच्या सोशल मीडियाच्या काळात जरा काळजी घ्या. कारण तुम्ही ‘मला ट्रोलर्सचा फरक पडत नाही’ असं कितीही म्हणालात तरी पाऊणतास तुम्ही ट्रोलर्स हाच विषय चघळत बसला होता हेसुद्धा तेवढंच खरं आहे.”