Marathi Actress Share OLA Post : मुंबईत-पुणे सारख्या शहरांत रात्री-अपरात्री वेळेत घरी पोहोचण्यासाठी सुरक्षित प्रवास म्हणून ‘ओला-उबेर’ (Ola-Uber) या कॅब सेवेला पसंती दिली जाते. मात्र या कंपन्यांकडून काही वेळेला ग्राहकांच्या विश्वासाला छेद दिला जातो आणि संधी मिळेल त्यानुसार ग्राहकाकडून अतिरिक्त पैसे घेतले जातात.

सामान्य प्रवाशांबरोबर अशा फसवणुकीचे काही प्रकार झाले आहेत. मात्र सामान्यांबरोबर अनेक कलाकार मंडळीदेखील यातून सुटली नाहीत. अशातच एका अभिनेत्रीने सोशल मीडियावर ‘ओला’ कंपनीच्या वर्तणूकीबद्दलची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. ही अभिनेत्री म्हणजे मधुगंधा कुलकर्णी.

मधुगंधाने ‘ओला’चे पैसे भरूनही तिला कंपनीकडून दंडाचे पैसे भरण्यासाठी वारंवार विचारणा केली जात आहे. याला वैतागून तिने थेट पुराव्यानिशी सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे. यासह तिने आपलं म्हणणंही मांडलं आहे. तसंच तिने चाहत्यांबरोबर आपली तक्रारही सांगितली आहे.

या पोस्टमध्ये मधुगंधा असं म्हणते, “मी ‘ओला’ पोस्टपेड ग्राहक आहे. माझं बिल ४ सप्टेंबर २०२५ रोजी भरायचं होतं, पण मी ते ३१ ऑगस्ट २०२५ आधीच भरलं. तरीही, ‘ओला’कडून मला वारंवार १०० रुपये दंड भरण्याचे मेसेजेस येत आहेत. मी एकूण ६०१ रुपये इतकी रक्कम भरली असून, त्याचे सर्व पुरावे आणि स्क्रीनशॉट्ससह ३ वेळा ईमेल पाठवले आहेत. पण अजूनपर्यंत कोणतंही समाधानकारक उत्तर किंवा कारवाई झालेली नाही.”

पुढे ती असं म्हणते, “याशिवाय अनेक ‘ओला’ ड्रायव्हर्स फोनवर बोलत बोलतच गाडी चालवत असतात, जे आमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं आणि आता तर वेळेवर पैसे भरल्यानंतरही मला असे दंडाचे त्रासदायक मेसेज पाठवले जात आहेत. ग्राहकांना वागवण्याचा हा प्रकार योग्य आहे का? की ही एक प्रकारची फसवणूकच (Scam) आहे?

मधुगंधा कुलकर्णी इन्स्टाग्राम पोस्ट

यानंतर पोस्टमधून मधुगंधा असं म्हणते, “बर्‍याच वेळा जेव्हा पेमेंट करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा मेसेजमधल्या लिंक्स नीट काम करत नाहीत. मग असा प्रश्न पडतो की, हे मुद्दाम केलं जातं का? म्हणजे ग्राहक उशिरा पैसे भरतील आणि मग त्यांच्याकडून दंड वसूल करता येईल?”

दरम्यान, मधुगंधाने शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. कमेंट्समध्ये काही नेटकऱ्यांनी त्यांचे काही अनुभव शेअर करत कॅब कंपनी आणि कॅब चालकांबद्दलची तक्रारही केली आहे.