Prarthana Behere Shares Knee Surgery Journey : छोट्या पडद्यावरील ‘पवित्र रिश्ता’ या हिंदी मालिकेतून नावारूपाला आलेली मराठी अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहेरे. मालिका आणि मराठी सिनेमांमधून प्रार्थनाने प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन केलं. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारी प्रार्थना सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय असते. सोशल मीडियावर ती तिचे फोटो-व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
अशातच काही दिवसांपूर्वी प्रार्थनाने सोशल मीडियाद्वारे तिच्या पायाला दुखापत झाल्याची पोस्ट शेअर केली होती. तिच्या डाव्या गुडघ्याची शस्त्रक्रिया झाल्याचे काही फोटो तिने शेअर केले होते. या शस्त्रक्रियेबद्दल प्रार्थनाने माहिती दिली आहे. नुकत्याच एका मुलाखतीत छोट्या दुखण्याकडे दुर्लक्ष केल्याने शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली असल्याचं ती म्हणाली.
राजश्री मराठीबरोबर साधलेल्या संवादात प्रार्थना म्हणाली, “माझा पाय मुरगळला होता. त्यामुळे गुडघा सुजला. मग डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे सगळं करत होते. त्यानंतर मी थायलंडला शूटिंगसाठी गेले; तेव्हा पाय आणखीनच सुजला. तेव्हासुद्धा बरं होईल असं म्हणत गोळ्या-औषधे घेऊन मी शूटिंग करत होते. १५-२० दिवस मी ते केलं. पण ते योग्य नव्हतं. त्यामुळे लिगामेंटला आणखीनच त्रास झाला. मग इथे आल्यावर कळलं की, यावर शस्त्रक्रियेशिवाय काही पर्यायच नाही.”
पुढे प्रार्थना सांगते, “माझ्या आयुष्यातील ही पहिलीच शस्त्रक्रिया होती. तेव्हा मला जाणवलं की, आपण आपल्या प्रकृतीकडे लक्ष देणं किती गरजेचं आहे. मी खरंच दुर्लक्ष केलं. याबद्दल माझा नवराही म्हणाला की, इतकं होईपर्यंत आणि शस्त्रक्रिया करेपर्यंत आपल्याला कसं काहीच कळलं नाही. या शस्त्रक्रियेमुळे मला सतत वेदना होत असतात. कारण, ही लगेच बरी होणारी गोष्ट नाही. वेळ लागतो. पण वेदना होतात; त्यामुळे गोळ्या-औषधे घ्यावी लागतात.”
प्रार्थना बेहेरे इन्स्टाग्राम पोस्ट
यानंतर प्रार्थना म्हणाली, “आता ठरवलं की, जास्त गोळ्या-औषधे घ्यायच्या नाहीत. अशातच बाप्पा आले आहेत. त्यांच्या आगमनानंतर मला स्वत:मध्ये एक वेगळी एनर्जी आल्याचं वाटतंय. ही एनर्जी नक्की कुठून आलीय माहीत नाही. मी गोळ्या-औषधे न घेता सगळी कामं करत आहे. हेच बाप्पामुळे आपल्या सगळ्यांना होतं असं मला वाटतं. पण यानिमित्ताने मी सांगू इच्छिते की, कृपया स्वत:च्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करुन नका किंवा गृहीत धरू नका.”