Rutuja Bagve On Rejection In Ananya Movie : नाटक, मालिका किंवा सिनेमात रिजेक्शन मिळणं किंवा एखाद्या कलाकृतीतून रिप्लेस केलं जाणं हे एखाद्या कलाकारांसाठी काही नवीन नाही. कलाकारांना त्यांच्या आयुष्यात अशा नकारांच्या अनेक प्रसंगांना सामोरं जावं लागतं. अर्थात, या रिजेक्शनचा प्रत्येक कलाकाराला त्रास होतोच. नाटक, मालिका किंवा सिनेमातील रिजेक्शन आणि रिप्लेसमेंटबाबत अनेक कलाकारांनी त्यांचे काही कटू अनुभव शेअर केले आहेत.
अशातच अभिनेत्री ऋतुजा बागवेनंसुद्धा रिजेक्शन आणि रिप्लेसमेंटचा एक अनुभव शेअर केला आहे. ‘अनन्या’ या लोकप्रिय नाटकातून ऋतुजानं आपली अभिनय क्षमता सिद्ध केली आहे. नाटकाशिवाय तिनं मालिका आणि सिनेमांतूनही प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. अशातच तिनं ‘अनन्या’ नाटकाचा सिनेमा करताना आलेल्या रिजेक्शन आणि रिप्लेसमेंटचा अनुभव शेअर केला आहे.
अभिनेत्री भार्गवी चिरमुलेला दिलेल्या मुलाखतीत ऋतुजाला ‘तू ‘अनन्या’ सिनेमात का नव्हतीस?’ असं विचारण्यात आलं. तेव्हा ऋतुजाने आधी हसत-हसत ‘तुम्ही याबाबत रवी जाधव यांना विचारा’ असं म्हटलं. तसंच ती ‘नो कमेंट्स’ असंही म्हणाली. पण, यानंतर तिनं स्वत:हून याबद्दल मला बोलायला आवडेल असं म्हणत सगळंच सांगून टाकलं.
“रिजेक्ट केलं गेलं याचा राग आला नाही, पण…”
यावेळी ऋतुजा म्हणाली, “मला रिजेक्ट केलं गेलं याचा राग आला नाही किंवा त्याचं वाईट वाटलं नाही. पण, रिजेक्ट करण्याची जी पद्धत होती ती निराशाजनक होती. त्या पद्धतीमुळे मी थोडी दुखावली गेली. ती पद्धत आणखी चांगली असू शकली असती, पण ठीक आहे. नाटकाचा सिनेमा होत असताना तुमची जी चॉइस असेल ती घ्यावी, त्याबाबत माझं काही म्हणणं नाही, त्याबद्दल आता मी बोलू इच्छित नाही.”
यानंतर ऋतुजा सांगते, “हृतानं ‘अनन्या’ सिनेमात उत्तम काम केलं आहे. तिच्या वाट्याला ही भूमिका आली हे तिचं भाग्य आहे आणि तिने छानच काम केलं. बऱ्याचदा रिजेक्शनचा त्रास होत नाही किंवा त्याची भीती वाटत नाही, पण त्याची जी पद्धत असते त्याचा परिणाम होतो हे मी अनेकदा अनुभवलं आहे. या इंडस्ट्रीत ती रिजेक्शनची पद्धतच सुधारायला हवी असं मला वाटतं.”
यानंतर ऋतुजानं ‘गोदावरी’ सिनेमाचं उदाहरण देत सांगितलं, “मी ‘गोदावरी’ सिनेमासाठी ऑडिशन दिलं होतं. त्यांना माझं पहिलं ऑडिशन आवडलं आणि मग त्यांनी दुसऱ्या ऑडिशनला बोलावलं. ती ऑडिशन मी जितेंद्र जोशी सरांबरोबर दिली. निखिल महाजनसारख्या दिग्दर्शकाला माझं काम आवडलं, त्यानं ऑडिशन घेतली आणि आपण जितेंद्र जोशी सरांबरोबर ऑडिशन केली, यातच मी खूप खूश होते. पुढे दोन दिवसांनी मला रितसर निखिल महाजन सरांचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की ऑडिशन झालं; पण तू जितेंद्र जोशीच्या बायकोच्या भूमिकेसाठी जात नाहीयेस. जितकी दुसरी अभिनेत्री छान वाटतेय आणि मग त्यात दुसरी अभिनेत्री म्हणून गौरी नलावडेची निवड करण्यात आली आणि तिनं छानच अभिनय केला आहे.”
यापुढे ऋतुजा म्हणाली, “हे आदरार्थी रिजेक्शन आहे किंवा हे रिजेक्शन नाही तर ‘नॉट सिलेक्शन’ आहे. हा फरक इंडस्ट्रीला कळला पाहिजे, म्हणून निखिल महाजन मला कमाल दिग्दर्शक वाटतो; कारण त्याला माणुसकी कळते. या परिस्थितीत तो माणूस म्हणून कसा आहे हे कळतं. हे रिजेक्शन पचवणं सोपं असतं. प्रत्येक कलाकृतीत मी असणार असं नाही. त्या कलाकृतीसाठी योग्य तोच कलाकार निवडला जाणार, पण ‘अनन्या’च्या वेळी हे झालं नाही. जे रिजेक्शन झालं; ते थोडं छान पद्धतीनं झालं असतं तर मला आवडलं असतं.”
पुढे ऋतुजा सांगते, “कमर्शिअल कामे करताना कमर्शिअल पद्धतीनं विचार केला जातो हे मलाही कळतंच. पण, ती रिजेक्शनची पद्धत मॅटर करते. ही पद्धतच सुधारायला हवी. ‘अनन्या’ नाटकानंतर मलाही अनेक ऑफर्स आल्या, पण तेव्हा मी खूप नाटकांना नाही म्हटलं. तेव्हा नाही म्हणताना मलासुद्धा जड गेलंच; कारण समोर अनेक सीनियर मंडळी होती. पण, त्यांनी तेव्हा माझं ‘नाही’ छान पद्धतीनं स्वीकारलं नाही; तर मला वाटतं की, एखाद्याला केलेलं रिजेक्शन आणि मला आलेलं रिजेक्शन माणूस म्हणून छान पद्धतीनं स्वीकारता आलं पाहिजे.”
