आज ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिवशी ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा केला जातो. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात कुसुमाग्रज यांनी मोलाचं योगदान दिलं आहे. मराठी भाषेला ज्ञानभाषा म्हणून ओळख निर्माण करून देण्यासाठी त्यांनी अथक मेहनत घेतली. त्यामुळे आज मातृभाषेचा गौरव करण्यासाठी व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिनवादन म्हणून ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करण्यात येतो.
‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करण्यासाठी ठिकठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जातात. सध्या मराठी कलाकार मंडळी मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा देताना दिसत आहे. अभिनेता स्वप्नील जोशी, तेजस्विनी पंडीत, अभिजीत केळकर अशा अनेक कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत. अशातच सोनाली कुलकर्णीच्या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
अभिनेत्रीने केशरी व लाल किनार असलेल्या साडीतले फोटो शेअर केले आहेत. सोनालीने या साडीवर बाराखडी असलेला नेकलेस घातला आहे. हे सुंदर फोटो शेअर करत सोनालीने चाहत्यांना ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “बाराखडी गिरवताना कुठे माहीत होतं? पुढे, हाती खजीना लागणारे! #मै . @maithilyapte मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.”
हेही वाचा – Video: मिस्टर अँड मिसेस बोडकेच्या लग्नाचा पहिला व्हिडीओ व्हायरल, अभिनेत्रीला अश्रू झाले अनावर
दरम्यान, सोनालीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, अलीकडेच तिचा पहिला वहिला मल्याळम चित्रपट ‘मलाइकोट्टई वालीबान’ प्रदर्शित झाला. या चित्रपटातील तिच्या कामाचं चहूबाजूने कौतुक झालं. आता लवकरच ती ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. २२ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.