Tejaswini Pandit’s Reaction On Elections : मराठी इंडस्ट्रीमधील सध्याच्या काही आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडित. तेजस्विनी उत्तम अभिनेत्री असण्याबरोबर एक यशस्वी निर्माती आणि उद्योजिकादेखील आहे. तेजस्विनीने काही मराठी मालिका आणि चित्रपटांपासून वेबसीरिजपर्यंत अशा सर्वच मध्यमांत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
अभिनयानं चर्चेत राहणारी तेजस्विनी सोशल मीडियावरही कायमच सक्रिय असते. सोशल मीडियाद्वारे ती तिची अनेक राजकीय आणि सामाजिक मतं शेअर करत असते. त्याचबरोबर ती अनेकदा राज ठाकरे यांच्याबद्दलही अनेक पोस्ट शेअर करत असते. अशातच अभिनेत्रीने राजकारणाबद्दल तिची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळी ही राजकारणातही तितकीच सक्रिय आहेत. मनोरंजन क्षेत्रातील अनेक समस्या सरकार दरबारी नेण्याचं काम ही कलाकार मंडळी करत असतात. अशातच तेजस्विनीला देखील राजकारणाबद्दल आणि निवडणूक लढवण्यात रस आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला.
तेजस्विनी पंडित इन्स्टाग्राम पोस्ट
अजबगजब या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत तेजस्विनी म्हणाली, “समाजकारणासाठी राजकारणातच सक्रिय असायला पाहिजे असं काही नाही. कधी कधी आपण असं म्हणतो की, इथे चिखल आहे, इथे घाण आहे. पण आपण ते कधी साफ करायला जात नाही. आपण ते केलं पाहिजे. मला वाटतं राजकारणाकडे लोकांनी एक करिअर म्हणून पाहिलं पाहिजे.”
यानंतर तेजस्विनी म्हणते, “पुढे जाऊन मला अशी संधी मिळाली आणि त्याचा मार्ग जर राजकारणातूनच जात असेल, म्हणजे समाजकारणासाठी राजकारणाचाच मार्ग स्वीकारावा लागला; तर मी करेन. पण याबद्दल अजून काहीच निश्चित नाही किंवा मला हे करायचं असं काही नाही. मी एक अभिनेत्री म्हणून खूप खुश आहे आणि याव्यतिरिक्त काही येईल याचा मला भरवसाच नाही.”
यापुढे तेजस्विनी म्हणाली, “राजकारण आणि मनोरंजन ही दोन्ही अवघड क्षेत्रं आहेत. आधीच एका अवघड क्षेत्रात असताना पुन्हा आणखी एक अवघड क्षेत्र स्वतःवर ओढावून घेण्याइतका माझ्या मेंदूला मला इतक्यात तरी त्रास द्यायचा नाही.” दरम्यान, तेजस्विनी सध्या तिच्या आगामी ‘ये रे ये रे पैसा ३’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. येत्या १७ जुलै रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.