केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. ३० जूनला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला असून प्रेक्षक या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद देत आहेत. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जोरदार कमाई केली आहे. चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, दीपा चौधरी या अभिनेत्रींनी मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटात वंदना गुप्ते यांनी साकारलेली भूमिका खूप गाजत आहे.
चित्रपटात दाखवल्याप्रमाणे वंदना गुप्ते खऱ्या आयुष्यातही तेवढ्याच डॅशिंग आहेत. नुकतचं एका मुलाखतीत वंदना गुप्ते यांनी नवऱ्याबाबतचा एक मोठा खुलासा केला आहे. तुम्ही नवऱ्यासाठी कधी अपशब्द वापरला होता का? असा प्रश्न वंदना गुप्तेंना विचारण्यात आला. यावर अभिनेत्रीने दिलेलं उत्तराने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. वंदना म्हणाल्या, “मी एकदा नवऱ्याला ‘च्यायला’ म्हणाले होते. मात्र, हा शब्द वापरल्यानंतर माझा नवऱ्याला राग आला नाही. पण त्याच्या आईला राग आला असेल तर मला माहिती नाही.”
‘बाईपण भारी देवा’ चित्रपट बघितल्यानंतर नवऱ्याची काय प्रतिक्रिया होती याबाबतही अभिनेत्रीने खुलासा केला आहे. त्या म्हणाल्या, “हा चित्रपट प्रदर्शित झाला त्यावेळी शिरीष यांच्या व्यग्र वेळापत्रकामुळे त्यांना हा चित्रपट पाहणं शक्य झालं नाही. म्हणून चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तीन-चार दिवसांनी शिरीष यांच्याबरोबर सिटीलाईट सिनेमाला संध्याकाळच्या शोला गेले होते. माझ्या नवऱ्याला तो चित्रपट खूप आवडला. हा चित्रपट पाहून झाल्यानंतर तो मला म्हणाला की, मला तुझ्याबद्दल वाटणारा आदर खूप वाढला आहे.”
हेही वाचा- ‘बाईपण भारी देवा’मध्ये वंदना गुप्तेंनी नेसलेल्या साड्यांची ‘भारी’ गोष्ट, जाणून घ्या…
‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाला संपूर्ण महाराष्ट्रातून भऱभरून प्रेम मिळत आहे. बायकांवर आधारित असणाऱ्या या चित्रपटाला पुरुषवर्गाकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. एका आठवड्यातच या चित्रपटाने १२.५० कोटींची कमाई केली आहे. तर अजूनही या चित्रपटाची यशस्वी घोडदौड सुरू आहे.