Ravi Jadhav Ganpati Idol Making Video : गणेशोत्सव अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत गणेशोत्सवाच्या आगमनाची लगबग सुरु आहे. प्रत्येक जण बाप्पाच्या आगमनासाठी आतुर आहे. गणेशोत्सवानिमित्त सगळीकडेच आनंदाचं आणि भक्तीभावाचं वातावरण पाहायला मिळत आहे. बाप्पासाठी मकर, प्रसाद आणि डेकोरेशनची जोरदार तयारी सुरू आहे. यात सेलिब्रिटीदेखील मागे नाहीत.

मराठी मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांकडेही गणेशोत्सव मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. अनेक कलाकारांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान होत असतात आणि बाप्पासाठी ही कलाकार मंडळी स्वत:च्या हातानेच तयारी करतात. अनेक कलाकार स्वत:च्या हाताने त्यांच्या घरचा गणपती बाप्पा साकारतात.

मराठी मनोरंजन विश्वातले लोकप्रिय दिग्दर्शक रवी जाधव हेही त्यांच्या घरच्या बाप्पाची मूर्ती स्वत:च्या हाताने घडवतात. रवी जाधव दरवर्षी स्वत:च्या हाताने घरीच छोटीशी मूर्ती घडवतात. गणपती साकारतानाचे व्हिडीओ ते आपल्या सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात. अशातच यंदाच्या वर्षीही ते स्वत:च्या हाताने गणपती बाप्पाची मूर्ती घडवत आहेत.

रवी जाधव यांनी स्वत:च्या हाताने बाप्पाची मूर्ती साकारतानाचा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते गणरायाची छानशी मुर्ती घडवताना दिसत आहेत. ‘बाप्पाच्या आगमनाची तयारी’ अशी कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिली आहे.

रवी जाधव दरवर्षी पर्यावरण पूरक गणपतीची मूर्ती साकारतात आणि त्यांच्या याच कृतीबद्दल चाहते कौतुक करतात. दरम्यान, रवी जाधव यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेक चाहत्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. “छान”, “मस्त”, “वाह” अशा अनेक प्रतिक्रिया चाहत्यांनी या व्हिडीओखाली व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, दिग्दर्शक रवी जाधव यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘नटरंग’, ‘बालगंधर्व’, ‘टाइमपास’सारख्या गाजलेल्या चित्रपटांचं दिग्दर्शन त्यांनी केलं आहे. तसंच हिंदीतही त्यांनी काम केलं आहे. ‘में अटल हूं’ आणि ‘ताली’सारख्या कलाकृतींमधून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.