सध्या ‘जारण’ या मराठी चित्रपटाची खूप चर्चा होत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलर प्रेक्षकांची मनं जिंकत असतानाच आता या चित्रपटातील प्रमोशनल साँग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. सोनाली कुलकर्णी व भार्गवी चिरमुले यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या या भयावह गाण्याला अमृता सुभाष, सिंधुजा श्रीनिवासन, मनीषा पांडरांकी, लक्ष्मी मेघना यांचा आवाज लाभला असून वैभव देशमुख यांच्या शब्दांनी या गाण्यात अधिकच रंगत आणली आहे. तर ए व्ही प्रफुल्लचंद्र यांच्या संगीताने या गाण्यातून चित्रपटाबद्दलची गूढता अधिकच वाढवली आहे.

‘जारण’च्या पोस्टरपासूनच प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती. त्यात टीझर व ट्रेलरने या उत्सुकतेत अधिकच भर टाकली. भय, अंधश्रद्धा आणि वास्तव यांचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी प्रेक्षक आतूर आहेत. त्यात आता या प्रमोशनल साँगने उत्कंठा वाढवली आहे.

सोनाली आणि भार्गवीने आपल्या प्रभावी अभिनयातून या गाण्यात एक रहस्यमय आणि भीतीदायक वातावरण निर्माण केले आहे. गाण्याचा मूड भयावह, गूढतेने भरलेला असून, त्यातील संगीत, पार्श्वभूमी आणि दिग्दर्शन प्रेक्षकांच्या मनात थरकाप निर्माण करणारे आहे.

निर्माते अमोल भगत म्हणाले, “या गाण्यातून आम्ही ‘जारण’ची भीतीदायक आणि सोबतच भावनिक बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. संगीत, गायन आणि व्हिज्युअल्स यांचे जबरदस्त मिश्रण प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आणणारे आहे. चित्रपटाचा मूड आणि आशय या एका गाण्यातून प्रभावीपणे व्यक्त होत आहे. या गाण्याची खास बाब म्हणजे सोनाली कुलकर्णी व भार्गवी चिरमुले या गाण्यात पाहायला मिळत आहेत. या दोघी उत्कृष्ट अभिनेत्री तर आहेतच याव्यतिरिक्त त्या माझ्या चांगल्या मैत्रिणी आहेत.”

सोनाली कुलकर्णी काय म्हणाली?

सोनाली कुलकर्णी म्हणते, ‘’माझ्यासाठी हा अनपेक्षित अनुभव होता. काय गाणे असेल, आपण कोणत्या झोनमध्ये जाणार आहोत, याची मला काहीच कल्पना नव्हती. त्यामुळे माझ्यासाठी हा सुखद धक्का होता. या प्रमोशनल साँगचा झोन खूप वेगळा आहे. गाण्याचे बोल अहिराणी भाषेत असल्याने शब्द सहज कळत नाहीत. त्यामुळे ते जाणून घेण्याची उत्सुकता वाढते. ते सतत लूपमध्ये ऐकत राहावसे वाटते. अतिशय भन्नाट गाणे आहे. मला खूप आनंद आहे, या चित्रपटाची जोडले गेले आहे. ही संधी समोरून चालून आली. त्यामुळे मी त्याला त्वरीत होकार दिला. त्यात हे गाणे मला स्वत:ला खूप आवडल्याने ते करतानाही मजा आली. कोरिओग्राफी खूप कमाल आहे. सगळेच अप्रतिम आहे. शिवाय सोबत भार्गवी आहे. खूप वर्षांनी एकत्र काम करत आहोत. आवडती माणसं असल्याने काम करताना खूप मजा आली.’’

भार्गवी चिरमुले म्हणाली, ‘’माझ्यासाठी हा खूप वेगळा आणि छान अनुभव आहे. एकतर कधीही न साकारलेली भूमिका मी केली आहे. चित्रपटाविषयी मी ऐकून होते आणि सगळ्यांसारखीच उत्सुकता मलाही होती. गाण्याचे बोल, संगीत, चित्रीकरण सगळेच अप्रतिम आहे. जबरदस्त कथा, अभिनय यांचा अनुभव प्रेक्षकांना चित्रपटगृहात येईलच. परंतु या प्रमोशनल साँगचा भाग झाल्याचा माझा अनुभव खूपच छान होता. यासाठी अमोलच मनापासून आभार.’’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘जारण’ चित्रपट येत्या ६ जून २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन हृषीकेश गुप्ते यांनी केले असून अमोल भगत आणि नितीन भालचंद्र कुलकर्णी यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. चित्रपटात अभिनेत्री अमृता सुभाष व अनिता दाते यांच्या प्रमुख भूमिका असून किशोर कदम, ज्योती माळशे, विक्रम गायकवाड, राजन भिसे, अवनी जोशी, सीमा देशमुख हे कलाकारही आहेत.