मराठी सिनेमांच्या तिकीटबारीवरील कमाईची कायमच चर्चा होताना दिसते. आठवड्याला अनेक मराठी सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येतात, मात्र यापैकी काही मोजके सिनेमेच प्रेक्षकांचं मन जिंकण्यात यशस्वी होतात. त्याचबरोबर कमाईच्या बाबतीतही जरा चांगली कामगिरी करतात. मराठी सिनेमांच्या कमाईबद्दलची बाब आता चिंताजनक असली तरी एक काळ असा होता, जिथे अनेक आठवडे मराठी सिनेमे चित्रपटगृहांमध्ये चालायचे.

मराठी सिनेमांना हा सुवर्णकाळ आणणारे दिग्गज म्हणजे दादा कोंडके. बॉलीवूडचे सुपरस्टार राजेश खन्ना असो किंवा मल्याळम चित्रपटांचे महानायक मोहनलाल असो… या कलाकारांच्या चित्रपटांनी अनेक आठवडे चित्रपटगृहांमध्ये आपली सत्ता गाजवली. त्यांचे चित्रपट २५ ते ४० आठवडे सिनेमागृहात चालायचे. पण, यांना टक्कर देणारा एक असा मराठी सुपरस्टार होता, ज्याचे तब्बल ९ चित्रपट सलग २५ आठवडे सिनेमागृहात हिट झाले होते.

या अफाट यशानंतर या दिग्गज अभिनेत्याचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्येही नोंदवले गेले. हा सुपरस्टार दुसरा तिसरा कोणी नसून दादा कोंडके आहेत. प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करणारा, विनोदाचा बादशहा आणि मराठी सिनेमाचा राजा म्हणजे दादा कोंडके.

८ ऑगस्ट १९३२ रोजी मुंबईच्या लालबाग परिसरातील एका कोकणस्थ कुटुंबात जन्मलेले दादा कोंडके यांचे खरे नाव कृष्णा कोंडके होते. त्यांचे बालपण नायगावच्या चाळीत गेले आणि तिथली बोली, तिथला साधेपणा त्यांच्या स्वभावात आणि अभिनयात उतरला. घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांनी लहानपणीच ‘अपना बाजार’मध्ये नोकरी सुरू केली. त्यानंतर ते सेवादलच्या बँडमध्ये सहभागी झाले. इथूनच त्यांच्या कलात्मक प्रवासाची सुरुवात झाली.

१९६९ साली भालजी पेंढारकरांच्या ‘तांबडी माती’ या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. पण, खरी ओळख त्यांना १९७१ मध्ये आलेल्या ‘सोंगाड्या’ या चित्रपटातून मिळाली. यातल्या ‘नाम्या’ या त्यांच्या साध्याभोळ्या आणि विनोदी व्यक्तिरेखेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. ‘पांडू हवालदार’, ‘अंधळा मारतो डोळा’, ‘राम राम गंगाराम’, ‘बोट लावीन तिथे गुदगुल्या’ अशा चित्रपटांनी दादा कोंडके यांना मराठी चित्रपटसृष्टीत अढळ स्थान मिळवून दिलं.

दादा कोंडकेंच्या तब्बल ९ चित्रपटांनी सलग २५ आठवडे सिनेमागृहांत यशस्वी कामगिरी केली आणि या कामागिरीसाठी त्यांचं नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं गेलं. ही कामगिरी आजवर कोणीही मोडू शकलेले नाही.

दादा कोंडके

दादा कोंडके यांची खास ओळख म्हणजे त्यांच्या चित्रपटांमधील त्यांचे दुहेरी अर्थाचे संवाद आणि धाडसी शीर्षकं. जसं की, ‘अंधेरी रात में दिया तेरे हाथ में’, ‘खोल दे मेरी जबान’ वगैरे. हे शीर्षक आणि संवाद अनेकदा सेन्सॉर बोर्डसाठी डोकेदुखी ठरायचे. पण, दादांच्या हुशारीमुळे आणि त्यांच्या राजकीय संपर्कांमुळे त्यांचे चित्रपट बंदीपासून वाचत असत.

दादा कोंडकेंनी केवळ मराठी नव्हे तर हिंदी आणि गुजराती चित्रपटांतही काम केलं. त्यांच्या ‘कामाक्षी प्रॉडक्शन’ या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी अनेक हिट चित्रपट तयार केले. उषा चव्हाण, महेंद्र कपूर, राम-लक्ष्मण यांसारख्या कलाकारांबरोबर त्यांनी यशस्वी चित्रपट दिले.