मुंबई : कौटुंबिक नात्यांमधील गोड–तिखट वळणे, हास्याची खमंग फोडणी आणि भावनिक प्रसंगांचा स्पर्श असलेला प्रसाद ओक दिग्दर्शित ‘वडापाव’ हा चित्रपट २ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाच्या प्रसिद्धी मोहिमेचा भाग म्हणून कलाकारांनी ‘रामनाथ पय्याडे कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी स्टडीज’ला सोमवार, २९ सप्टेंबर रोजी भेट दिली. याप्रसंगी सदर महाविद्यालयातील विद्यार्थी शेफ्सनी तब्बल साडेसात किलोचा ‘वडापाव’ बनवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
‘वडापाव’ चित्रपटात तीन पिढ्यांचे वातावरण, घरातील गंमती-जंमती आणि नात्यांचे गोड-तिखट मिश्रण अनुभवायला मिळणार आहे. प्रसाद ओक यांच्यासह गौरी नलावडे, रितिका श्रोत्री, अभिनय बेर्डे, सिद्धार्थ साळवी, शाल्व किंजवडेकर, डॉ. महेश पटवर्धन व निर्माते अमेय खोपकर, निनाद बत्तीन, मोहसीन खान यांनी ‘रामनाथ पय्याडे कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी स्टडीज’च्या संकुलात उपस्थित राहत विद्यार्थी शेफ्सचे भरभरून कौतुक केले आणि भव्य वडापावचा आस्वाद घेतला.
दरम्यान, दिग्दर्शक व अभिनेते प्रसाद ओक म्हणाले की, ‘भव्य वडापाव बनवून विद्यार्थ्यांनी आम्हाला सुंदर भेट दिली आहे. इतका मोठा वडापाव बनवणे अतिशय कठीण व आव्हानात्मक काम आहे. मात्र, या शेफ्सनी ते करून दाखवले असून त्यांचे कौतुक आहे. त्यांनी साडेसात किलोचा वडापाव आमच्यासाठी तयार केला. या कुरकुरीत सरप्राईजसाठी मी संपूर्ण टीमकडून कॉलेजमधील शेफ्स आणि विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.
आज आम्हाला हा भव्य व चविष्ट वडापाव भेट म्हणून मिळाला आणि आम्हीही तुम्हा सर्वांना आमच्या ‘वडापाव’ची भेट २ ऑक्टोबरला देणार आहोत’. एबी इंटरनॅशनल फिल्म्स एलएलपी, मर्ज एक्सआर स्टुडिओ, व्हिक्टर मुव्हीज लिमिटेड, अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट आणि मोहसीन खान प्रस्तुत, सिनेमॅटिक किडा बॅनरअंतर्गत ‘वडापाव’ चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.
निर्माते अमित बस्नेत, प्रजय कामत, स्वाती खोपकर आणि निनाद नंदकुमार बत्तीन असून सहनिर्माते तबरेझ एम. पटेल आणि सानीस खाकुरेल आहेत. छायाचित्रण दिग्दर्शक संजय मेमाणे, तर लेखन सिद्धार्थ साळवी यांनी केले आहे. या चित्रपटात प्रसाद ओक, गौरी नलावडे, शाल्व किंजवडेकर, रितिका श्रोत्री, समीर शिरवाडकर, सिद्धार्थ साळवी, अश्विनी देवळे-किन्हीकर आणि सविता प्रभुणे यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.