Marathi Writer Post on Hindi Language : महाराष्ट्रात सध्या हिंदी भाषेचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. शालेय अभ्यासक्रमामध्ये हिंदी भाषा अनिवार्य करण्यावरून सर्वत्र चर्चा सुरू आहे. राज्यातील मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांना इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना हिंदी भाषा शिकवावी लागणार आहे. सरकाच्या या निर्णयाला राजकीय वर्तुळातून विरोध केला जात आहे. शालेय शिक्षणात पाचवी किंवा सहावीनंतर येणारा हिंदी भाषेचा विषय पहिलीपासूनच शिकवण्याला विरोधी पक्षांनी तीव्र शब्दांत विरोध केला आहे.
याबद्दल केवळ राजकीय क्षेत्रातूनच नव्हे, तर मनोरंजन क्षेत्रातूनही कलाकार मंडळी त्यांची मतं व्यक्त करत आहेत. हेमंत ढोमेने या निर्णयाबद्दल स्पष्ट भूमिका व्यक्त केली होती. त्यानंतर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’फेम समीर चौघुलेंनीही या निर्णयावर त्यांचं पोस्टद्वारे मत व्यक्त केलं. अशातच आता मराठी लेखक अरविंद जगताप यांनीही हिंदी भाषेच्या सक्तीच्या निर्णयाबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
अरविंद जगताप यांनी इन्स्टाग्रामवरील पोस्टमधून उपरोधिक टीका केली आहे. त्यात ते असं म्हणतात, “पहिलीतल्या २० मुलांनी एकत्र यायचं आणि तिसरी वेगळी भाषा निवडायची. मग हे सरकार शिक्षक देणार. म्हणजे पक्ष फोडायचा अन् आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासून शिकायचं म्हणा ना.” अरविंद जगताप यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टवर अनेकांनी त्यांची मतंही व्यक्त केली आहेत.
अरविंद जगताप यांची इन्स्टाग्राम पोस्ट
अरविंद यांनी शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी “कडू आहे; पण वास्तव तेच आहे”, “अगदी बरोबर”, “अगदी मुद्द्याचं बोललात”, “एकदम परखड” अशा अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अरविंद जगताप हे मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय लेखक आहेत. ते सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. तसेच अनेक सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर ते त्यांची मतं व्यक्त करत असतात. अशातच हिंदी भाषेबद्दलच्या सरकारी निर्णयावरही त्यांनी मत व्यक्त केलं आहे.
दरम्यान, पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना हिंदी भाषा शिकवणं अनिवार्य करण्यात आलेलं नाही. मात्र, असं असलं तरीही हिंदीऐवजी इतर तिसरी भाषा निवडण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. सरकारचा हा निर्णय हिंदीला गुप्तपणे प्रोत्साहन देणारा असल्याचं अनेक शिक्षणतज्ज्ञ व विरोधकांचं म्हणणं आहे. त्याचबद्दल सर्व क्षेत्रांतून प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहेत.