Mrunmayee Deshpande Revealed How Sunil Barve Praised Her: पडद्यावर काम करणारे कलाकार अनेकदा त्यांच्या शूटिंगदरम्यानच्या आठवणीदेखील सांगत असतात. अनेकदा या आठवणी या कलाकारांसह प्रेक्षकांनादेखील भारावून टाकतात. एका मुलाखतीत अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने अभिनेते सुनील बर्वे यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला होता.

त्याच्या डोळ्यांत मला खूप कौतुक…

मृण्मयी देशपांडेने ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत अभिनेत्रीने सुनील बर्वे यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला होता. मृण्मयी म्हणालेली, “कुंकू या मालिकेचे शूटिंग सुरू होतं. आमच्या कुठल्यातरी सीनचे शूटिंग सुरू होते. बोलता-बोलता जानकीच्या डोळ्यात पाणी येतं, असा काहीतरी सीन होता. मी ते वाक्य बोलले. मी बोलतानाच मला दोन सेकंद सुनील दादाच्या चेहर्‍यावरचे भाव मला दिसले. तो नरसिंह म्हणून तो व्यक्त झाला नाही. त्याच्या डोळ्यांत मला खूप कौतुक दिसलं.”

“सीन कट झाला. तो काहीच बोलला नाही. त्याने माझा हात पकडला आणि तो मला मेकअप रुममध्ये घेऊन गेला. त्याने अचानक असे केल्यामुळे मला वाटलं की मी काही चुकीचं केलं का? संपूर्ण सेटसमोर त्याने मला काही न बोलता तो मला घेऊन गेला. त्यामुळे नेमकं काय झालं, हे मला कळेना. त्याने त्याचं पाकिट उघडलं. त्यादिवशी त्याच्या पाकिटात जितके पैसे होते, ते सगळे माझ्या हातात ठेवले.”

“तो मला म्हणाला की बाळा, तू जे आता केलंस ना ते जप. तुझं कौतुक करण्यासाठी माझ्याकडे आता शब्द नाहीत. आता माझ्या पाकिटात २ कोटी रुपये असते, तर मी तेसुद्धा तुला दिले असते, इतका छान तू अभिनय केलास, तो मला आवडला. साहजिकच त्याचं ते बोलणं ऐकून मी भारावून गेले होते. मी खूप खूष झाले होते. तो माझ्यासाठी बेंचमार्क झाला.”

अभिनेत्री असेही म्हणाली होती, “मी ‘सुखन’चा प्रयोग बघायला गेले होते. ‘सुखन’मधील ओम भूतकरचं सादरीकरण बघून मला खूप आवडलं. त्या दिवशी ‘सुखन’चा प्रयोग झाल्यानंतर स्टेजवर गेले. माझ्या पर्समध्ये जितके पैसे होते, ते सगळे काढले आणि मी ते ओमच्या हातावर ठेवले. मी त्याला सांगितलं की हे असं कौतुक कोणीतरी माझं केलं आहे. कदाचित माझा अभिनय पाहून सुनील दादाला त्यावेळी छान वाटलं असेल. मी ओमचं सादरीकरण पाहून वेडी झाले होते. त्याचा परफॉर्मन्स पाहिल्यानंतर मी कुठल्यातरी वेगळ्या विश्वात होते. “

दरम्यान, अभिनेत्री मालिका, चित्रपटातून अभिनय करत प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसते. ती रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालन करतानादेखील दिसते. काही दिवसांपूर्वीच ‘एक राधा एक मीरा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तसेच, ती स्टार प्रवाहवरील ‘शिट्टी वाजली रे’ या कार्यक्रमातदेखील दिसली होती. याबरोबरच, अभिनेत्री सोशल मीडियावरदेखील सक्रिय असल्याचे पाहायला मिळते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.