Kranti Redkar Talks About Jatra Movie : केदार शिंदे दिग्दर्शित ‘जत्रा’ चित्रपट हा मराठीतील गाजलेल्या चित्रपटांपैकी एक मानला जातो. अभिनेते भरत जाधव, क्रांती रेडकर यांनी यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली. यामधील त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री अनेकांच्या पसंतीस पडली होती. परंतु, तुम्हाला माहीत आहे का, ‘जत्रा’साठी क्रांती रेडकरला पहिली पसंती नव्हती.

‘जत्रा’ हा चित्रपट २००६ साली चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला. परंतु, त्यावेळी चित्रपटगृहात त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. मात्र, हाच चित्रपट टेलिव्हिजनवर प्रदर्शित झाल्यानंतर मात्र अनेकांनी तो पाहिला. तर अनेक जण आजही हा चित्रपट तितक्याच आवडीने पाहतात. अशातच आता ‘जत्रा’मधील कलाकारांचं रियुनियन झालं असून नुकतीच त्यांनी ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली आहे.

केदार शिंदे, क्रांती रेडकर, भरत जाधव, प्रिया बेर्डे, सिद्धार्थ जाधव या कलाकारांनी एकत्र मुलाखत दिली असून यावेळी त्यांनी या चित्रपटाबद्दलचे अनेक किस्से सांगितले आहेत. अशातच यावेळी क्रांतीने ‘जत्रा’ चित्रपटासाठी तिच्याआधी दुसऱ्या अभिनेत्रीला विचारणा झाल्याचं म्हटलं आहे.

‘जत्रा’साठी ‘या’ अभिनेत्रीला होती पहिली पसंती

क्रांती याबद्दल म्हणाली, “या चित्रपटाचा किस्सा असा आहे की, हा चित्रपट आधी अदिती सारंगधरला ऑफर झालेला. कारण त्यावेळी ‘वादळवाट’ हिट होती.” केदार शिंदे यावर म्हणाले, “तिची लूक टेस्ट पण झालेली.” क्रांती पुढे म्हणाली, “तिला या चित्रपटातील शेवंताच्या भूमिकेसाठी विचारण्यात आलेलं, पण तिला प्रिया ताईने साकारलेली अक्का ही भूमिका साकारायची होती.”

क्रांतीने पुढे याबद्दल सांगितलं, “तेव्हा केदार तिला म्हणाला, ही भूमिका प्रिया करणार आहे आणि त्यासाठी तिची निवड झाली आहे; मला त्या भूमिकेत तू कुठेही दिसत नाही, कारण तू खूप लहान आहेस. तिला शेवंता ही भूमिका करायची नव्हती, तिला तेव्हा अक्काची भूमिकाच साकारायची होती, त्यामुळे तिने चित्रपटातून माघार घेतली.”

क्रांती रेडकरला ‘असा’ मिळालेला ‘जत्रा’ चित्रपट

क्रांतीला हा चित्रपट कसा मिळाला याबद्दल तिने सांगितलं आहे. ती म्हणाली, “त्यावेळेला मी भारती आचरेकरबरोबर काम करत होते आणि तेव्हा मला असं वाटत होतं की मला जग फिरायचं आहे. मला हिंदी इंग्रजी नाटकांत काम करायचं आहे. तेव्हा माझी भारती आचरेकरबरोबर ‘फनी थिंग कॉल्ड लव्ह’ हे नाटक सुरू होतं. याबरोबर भारती मावशी केदारच्या मालिकेतही काम करत होती. जेव्हा तिला कळलं की या चित्रपटासाठी नायिका शोधत आहेत, तेव्हा तिने केदारला माझं नाव सुचवलं आणि म्हणाली की, अरे आपल्या वेड्या मुलीला विचार. क्रांती आहे ना. त्यावर केदारचं असं झालं की, मी हिला कसं विसरलो.”

“केदराने मला त्यानंतर फोन करून सांगितलं, क्रांती एक सिनेमा करतोय; मी म्हटलं कधी, तो म्हणाला, ये तू उद्या दादरला, मग बोलू. काय आहे, कसं कथानक आहे, याबद्दल काहीच माहीत नव्हतं,” असं क्रांती म्हणाली. क्रांतीने पुढे सांगितलं की, सेटवर हे सगळे माझी खूप मस्करी करायचे. मला भाषेवर काम करावं लागलं. मला कासारीण कोण आहे हेसुद्धा माहीत नव्हतं. त्यावेळी मेकअपबद्दलही फार माहित नव्हतं पण केदारमुळे मी मेकअप करायला शिकले.”